राजकीय व्यंगचित्रांबरोबरच बाळासाहेबांनी मराठी माणसावर होणार्या अन्यायाविरुद्ध लेखणी-वाणी आणि कुंचल्याच्या माध्यमातून लढा उभारला. प्रबोधनकारांनी सुचवल्याप्रमाणे ‘शिवसेना’ या नावाचा झंझावात महाराष्ट्रात निर्माण झाला. ‘मार्मिक’ हे त्या लढ्याचं शब्दचित्रशस्त्र होतं. बघता बघता शिवसेनेने राज्यव्यापी स्वरूप धारण केलं. ‘मार्मिक’मधले विचार वाचणे आणि त्यावर चर्चा होणे हे घराघरांत घडू लागलं. ‘मार्मिक’मधून ‘प्रबोधकारांपासून अनेक दिग्गजांचे लेख येऊ लागले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर लगेच ‘मार्मिक’चा उदय झाला. मराठीमधील आणि देशातलंही एक प्रभावी व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून त्याला सर्वत्र मान्यता मिळाली. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रं त्यापूर्वीही ‘प्रâी प्रेस’, ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिका’ आणि ‘मराठा’मध्ये प्रसिद्ध होतच असत. त्यांच्या कुंचल्याचे ‘फटकारे’ त्या काळात भल्याभल्यांची झोप उडवत. सामान्य माणसाच्या अपेक्षा आणि राजकारणातील विसंगती यावर ‘मार्मिक’ भाष्य करणार्या या व्यंगचित्रांचा बोलबाला देशभर होता. एवढंच नव्हे तर त्यांच्या प्रत्ययकारी व्यंगचित्रांना आंतरराष्ट्रीय मान्यताही लाभली होती.
आमचे सख्खे शेजारी असलेल्या सुभेदार यांच्याकडे ‘मार्मिक’ पहिल्या अंकापासून येऊ लागलं. त्या वेळी मी अवघा सात वर्षांचा होता, परंतु घरी-शेजारी होणारी राजकारणावरील चर्चा ऐकून जे थोडं फार कळायचं त्याचंच प्रतिबिंब बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांत दिसायचं आणि अनेकदा त्यांची व्यंगचित्रं नवी दृष्टी द्यायची. कालांतराने मीही ‘मार्मिक’ घेऊ लागलो. अनेक वर्षे ते अंक जपून ठेवले होते. कारण त्यातल्या व्यंगचित्रांनी एवढी भुरळ घातली होती की, कित्येक वेळा त्या व्यंगचित्रांच्या रांगोळ्या दिवाळीत दिसायच्या. आम्ही तर फिरत्या कंदिलातली चित्रं ‘मार्मिक’च्या व्यंगचित्रांवरून चितारली होती.
राजकीय व्यंगचित्रांबरोबरच बाळासाहेबांनी मराठी माणसावर होणार्या अन्यायाविरुद्ध लेखणी-वाणी आणि कुंचल्याच्या माध्यमातून लढा उभारला. प्रबोधनकारांनी सुचवल्याप्रमाणे ‘शिवसेना’ या नावाचा झंझावात महाराष्ट्रात निर्माण झाला. ‘मार्मिक’ हे त्या लढ्याचं शब्दचित्रशस्त्र होतं. बघता बघता शिवसेनेने राज्यव्यापी स्वरूप धारण केलं. ‘मार्मिक’मधले विचार वाचणे आणि त्यावर चर्चा होणे हे घराघरांत घडू लागलं. ‘मार्मिक’मधून ‘प्रबोधकारांपासून अनेक दिग्गजांचे लेख येऊ लागले.
आमचे दुसरे सख्खे शेजारी रानडे यांचे मोठे बंधू प्रा. स. अ. रानडे ‘मार्मिक’साठी ‘महाराष्ट्र मागे का?’ हे सदर नियमितपणे लिहित असत. सेनेच्या पहिल्या मेळाव्यात त्यांनी शिवतीर्थावर भाषणही केलं होतं. ते केव्हा तरी भेटत. त्यांच्याकडून ‘मार्मिक’ आणि शिवसेनेच्या भूमिकेचं विवेचन ऐकायला मिळायचं.
त्या काळी ‘मार्मिक’मध्ये येणारं ‘शुद्धनिषाद’ म्हणजे श्रीकांत ठाकरे यांचं सडेतोड ‘सिनेप्रिक्षानं’ सर्वांना आवडायचं. प्रमोद नवलकरांची भटक्याची भ्रमंती आणि पंढरीनाथ सावंत ‘टोच्या’ या नावाने लिहित असलेले लेख वाचकप्रिय होते. प्रबोधकार ठाकरे आणि बाळासाहेबांचे तेजस्वी विचार हा ‘मार्मिक’चा मानबिंदू होता.
त्याचबरोबर एखादी कविता किंवा गाणं आठवावं इतक्या सहजतेने बाळासाहेबांची अनेक व्यंगचित्रं आठवतात. अमेरिकेचं चांद्रयान १९६९ मध्ये चंद्रावर गेलं त्याचवेळी इंदिरा गांधींनी मोरारजी देसाई यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं. त्याबाबतचा वाक्प्रचार लक्षात घेऊन बाळासाहेबांनी मोरारजींचं यान चंद्रकोरीवर उतरलंय असं व्यंगचित्र काढून ‘…आणि आमचं हे यान, अर्धचंद्रावर’ गेलं! (म्हणजे त्यांची हकालपट्टी झाली) अशी ‘मार्मिक’ टिप्पणी केली. एका आंतरराष्ट्रीय परिषदेला पाकचे भुत्तो न बोलावता गेले आणि त्यांना प्रवेश नाकारण्यात आला तेव्हाच्या व्यंगचित्रात बाळासाहेबांनी दाराबाहेर बसलेल्या कुत्र्याला भुत्तोचं रूप देऊन ‘कुत्तो!’ एवढा एकच शब्द लिहिला. कमीत कमी शब्द आणि ताकदीच्या रेषांमधून एखाद्या घटनेचा संपूर्ण आशय निर्माण करण्याची त्यांचं कौशल्य विलक्षण होतं.
जॉर्ज फर्नांडिस हे बाळासाहेबांचे मित्र, पण दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला कुठल्या तरी संपाची हाक देत. ‘मार्मिक’ व्यंगचित्रात असं दाखवलं गेलं की पाऊस सुरू झालाय आणि रस्त्यावरचं ‘मॅनहोल’ उघडत बाहेर येणारे जॉर्ज म्हणतायत ‘आम्ही आऽऽलो!’ हे बघून जॉर्जनाही गंमत वाटली असेल.
‘मार्मिक’चे लेखक असलेले पंढरीनाथ सावंत पुढे मित्र होतील आणि आपणही ‘मार्मिक’साठी लिहू असं पत्रकारितेत येण्यापूर्वी वाटणं शक्यच नव्हतं. तेव्हा आम्ही फक्त ‘मार्मिक’साठी ओढ असलेले वाचक होतो. पंढरीनाथ सावंत ‘मार्मिक’च्या पहिल्या अंकापासून ‘मार्मिक’ कुटुंबात होते. कालांतराने ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक झाले. त्यांनी ‘मार्मिक’साठी विविध विषयांवर विपुल लेखन केलं आहे. त्यांच्या प्रेरणेने नंतरच्या काळात ‘मार्मिक’साठी अनेक विषयांवर आणि विशेषत: दिवाळी अंकासाठी लिहू लागलो. त्यानिमित्ताने ‘मार्मिक’च्या ऑफिसात जाणं व्हायचं. सेना भवनात ‘मार्मिक’चं ऑफिस असताना एकदा अचानक बाळासाहेब तिथे आले. आम्ही उठून उभे राहिलो तेव्हा ते उद्गारले, ‘अरे, बसा बसा, तुम्ही कामात आहात मी सहज आलोय.’ मग त्यांनी अंकातले लेख कोणते याविषयी माहिती घेतली. तिथे एक चित्रकार काही लेटरिंग व्ाâरत होता त्याला मार्गदर्शन केलं. आमच्या सर्वांच्याच थोड्या गप्पा झाल्या आणि त्यांच्या स्वभावातली ऋजुता पाहून घरातलीच वडीलधारी व्यक्ती बोलतेय असं वाटलं.
पूर्वी व्यंगचित्राचं कव्हर, रविवारची जत्रा आणि आतमध्ये किमान दोन अर्ध्या पानांची व्यंगचित्र असलेला ‘मार्मिक’ काळाच्या ओघात रंगीत झाला. विषय कालानुरूप बदलले. बाळासाहेब आणि श्रीकांत यांची व्यंगचित्रं थांबली. सेनेची तोफ ‘सामना’मधून धडाडू लागली, पण ‘मार्मिक’ने निर्माण केलेला इतिहास हा चिरंतन ठेवा आहे. या वर्षी ‘मार्मिक’ला (१३ ऑगस्ट) साठ वर्षें पूर्ण झाली. सलग साठ वर्षं चालणारं आणि महाराष्ट्रात स्वाभिमानी विचारांचं बीज रुजवणारं असं अन्य व्यंगचित्रं साप्ताहिक जगातली नसेल. हा ‘मार्मिक’चा विक्रमच आहे. ‘मार्मिक’च्या षष्ठ्यब्दीपूर्तीबद्दल आणि पुढील दमदार वाटचालीसाठी अनेक सदिच्छा!
– मुलाखत घेण्याच्या निमित्ताने चार-पाच वेळा बाळासाहेबांची भेट झाली. एकदा ते ‘रविवारची जत्रा’ चितारत होते. ‘एवढं संपवतो मग बोलू’ असे ते म्हणाले. मी त्यांचं चित्रकौशल्य डोळ्यात साठवत होतो. ‘जत्रा’ पूर्ण झाल्यावर म्हणाले, ‘बघ, कसं वाटतंय?’ मी अवाक! बाळासाहेबांनी त्या काळातले अशोक मेहता, कामराज आणि अन्य राजकारणी असे काही अप्रतिम साकारले होते की अशी ‘रेषा’ कोणाच्याच कुंचल्यात नाही हे जाणवत होतं.