आज १४ डिसेंबर. मार्गशीर्ष अमावस्या. या महिन्याच्या अमावस्येला अगहन अमवस्या असेही म्हटले जाते. अनेक प्रकारे ही अमावस्या महत्त्वाची मानली गेली आहे. त्यामुळे या दिवशी देव आणि पितर या दोघांची पूजा करायला हवी असे म्हटले गेले आहे.
ही अमावस्या सोमवारी आली आहे. त्यामुळे तिला सोमवती अमावस्या असेही म्हटले जाते. वास्तविक प्रत्येक अमावस्येचे खास महत्त्व असतेच, पण मार्गशीर्ष अमावस्येचे आपलेच एक आगळे महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा असल्याचे मानतात. त्यामुळे या महिन्यात त्यांची पूजाअर्चा खूप पुण्य देऊन जाते असेही पोथी पुराणात लिहिले आहे. भगवान श्रीकृष्णांनीही या महिन्याचे महत्त्व विषद केले आहे. या अमावस्येला म्हणूनच देवीदेवतांसोबत आपल्या पितरांचीही पूजा करायला हवी आणि दानपुण्य करावे असे त्यांनी म्हटले आहे.
मार्गशीर्षमध्येच दिले गीतेचे ज्ञान
आपल्या हिंदू धर्मात गीता हा सर्वात पवित्र ग्रंथ मानला गेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी मार्गशीर्ष महिन्यातच गीतेचे ज्ञान दिले होते. म्हणूनच या महिन्यात आलेल्या सर्वच सणवाराला महत्त्व आहे. या महिन्यात व्यक्ती धार्मिक कार्ये करेल तर त्याचे पुण्य त्याला जास्त मिळते.
मार्गशीर्ष अमावस्येची महती
शास्त्र आणि पुराणांमध्ये नमूद करण्यात आल्यानुसर देवीदेवतांची पूजा करण्याआधी आपल्या पितरांना प्रसन्न करून घेणे जास्त महत्त्वाचे असते. मार्गशीर्ष अमावस्येचे व्रत केल्यास पितर प्रसन्न होतात. कुणाच्या कुंडलीत पितृदोष असेल वा कुणाला संतानप्राप्ती होत नसेल अशा लोकांनी मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पूजाअर्चा करायला हवी. विष्णूपुराणातही उल्लेख आहे की, या अमावस्येच्या दिवशी व्रत ठेवल्यास केवळ पितरांचे आत्मेच नव्हे, तर ब्रह्मा, इंद्र, सूर्य, अग्नी, पशूपक्षी आणि समस्त प्राणीजन तृप्त होतात. या दिवशी केले गेलेले दान मोक्षाची प्राप्ती घडवून आणू शकते.
असे करा मार्गशीर्ष अमावस्येचे विधी
मार्गशीर्ष अमावस्येचे व्रत केले असेल तर या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करून त्यांची कथा ऐकली पाहिजे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे पुण्याचे ठरते. किंवा आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळले तरी चालू शकते. त्यानंतर घरातील सर्व देवीदेवतांची पूजा करावी. खास करून या दिवशी भगवान श्रीकृष्णांची पूजा करून गीतापठन करणे जास्त चांगले मानले गेले आहे. हे व्रत करणार्यांनी आंघोळीनंतर पूजा साहित्यासह पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तेथे झाडाला दूध आणि पाणी अर्पण करायला हवे. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना फुले, अक्षता अर्पित करावीत. त्यानंतर गीतापठण करावे असे म्हटले गेले आहे. यंदा मार्गशीर्ष अमावस्या १३ डिसेंबरच्या रात्री १२ वाजून ४४ मिनिटांपासून १४ डिसेंबरच्या रात्री ९ वाजून ४६ मिनिटांपर्यंत आहे.