मामाचा सुगावा लागल्यावर पोलिसांनी बंगलोर पोलिसांना तशी माहिती कळवली. मामाला कुठला संशय आला की काय कुणास ठाऊक, पण मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे छापा घातल्यावर तो सापडला नाही. बहुधा त्यानं फोन कुठेतरी लपवून ठेवला होता, किंवा फेकून दिला होता.
“चल, मला निघायला हवं आता. सात वाजेपर्यंत तरी घरी पोहोचते!“ असं म्हणून नेहानं तिची मैत्रीण आसावरीचा निरोप घेतला, तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. रिक्षाने ती घरी आली. फ्लॅटच्या दाराचे कुलूप किल्लीने उघडलं, आत गेली. दरवेळी आल्यावर पर्स आणि उरलेले पैसे कपाटात ठेवायची तिची सवय होती. कपाटाच्या लॉकरची किल्ली पलंगावरच्या गादीखाली असायची. तिनं किल्ली काढली, कपाट उघडलं. किल्लीने लॉकर उघडून पर्स आत ठेवायला गेली आणि एकदम किंचाळली.
पोलिस स्टेशनमधला फोन खणखणला. हवालदार वाघमारेंनी फोन घेतला.
“हॅलो, बेलवाडी पोलिस स्टेशन, ठाणे अंमलदार वाघमारे बोलतोय.”
“साहेब, आमच्या घरी चोरी झालेय. कपाटाच्या लॉकरमधले सगळे दागिने आणि पैसे चोरीला गेलेत! तुम्ही लवकर या!”
घाबरलेली, हादरलेली नेहा फोनवरून एवढंच बोलू शकली. वाघमारेंनी तिला धीर दिला, शांत व्हायला सांगितलं. जुजबी प्रश्न विचारून नक्की काय काय चोरीला गेलंय, घरी कोण आहे वगैरे विचारून घेतलं. नेहानं आधीच तिच्या नवर्याला, अजितला ही बातमी कळवली होती.
अजित आणि नेहा मानकर हे मध्यमवर्गीय दांपत्य सुखात आयुष्य जगत होतं. आठ वर्षांचा एक मुलगा होता, आर्थिक स्थिती चांगली होती. सगळ्यांशी सलोख्याचे संबंध होते. या तिघांशिवाय घरात आणखी एक व्यक्ती राहायची; तो होता त्यांच्याकडे कामाला असलेला पंधरा वर्षांचा मुलगा, रोशन. रोशन होता मूळचा विदर्भातला. त्याच्या मामानं शिकण्यासाठी म्हणून त्याला मोठ्या शहरात आणलं होतं. मात्र मामाचा उद्देश त्याला शिकवण्याचा नाही, तर त्याला राबवून घेऊन त्याच्याकडून पैसे उकळण्याचा होता. त्याच्या जिवावर मामाला आयतं बसून खाता येणार होतं.
एकदा कुठल्यातरी कारणावरून मामा रोशनला मारत असताना रस्त्याने निघालेल्या अजित मानकरांनी ते बघितलं आणि त्याला थांबवलं. “एवढी काळजी असंल, तर तुम्हीच घेऊन जा त्याला!” असं मामानं सुनावलं आणि अजित त्याच क्षणी रोशनला आपल्या घरी घेऊन आले. रोशन त्यांच्या घरात लवकरच रुळला. घरातली छोटीमोठी कामं करायला लागला. त्या बदल्यात मानकर दांपत्य त्याची काळजी घेई, त्याला जेवूखाऊ घाली.
चोरी करताना चोरानं दाराचं कुलूप आणि तिजोरीही फोडलेली नव्हती, त्यामुळे चोर कुणी माहीतगारच असावा, हे उघड होतं. पोलिसांना पहिला संशय रोशनवरच आला. रोशन कामासाठी बाहेर गेलाय आणि रात्री आठपर्यंत येणारेय, असं नेहाने त्यांना सांगितलं. दिलेली वेळ कधीही न चुकवण्याची त्याची ख्याती होती. मानकरांच्या घरी चोरी झाली, तेव्हा घरी कुणीच नव्हतं. अजित मानकर त्यांच्या ऑफिसात, नेहा तिच्या मैत्रिणीकडे होती. मुलगा अनिश याला त्यांनी आदल्या दिवशीच मावशीकडे राहायला पाठवलं होतं. चोरानं बरोबर डाव साधला होता. घरी कुणीही नसताना त्यानं तिजोरी साफ केली होती. मात्र, घराची आणि तिजोरीची किल्ली त्याला मिळाली कुठून?
अजित मानकरांकडेही पोलिसांनी रोशनबद्दल खोलात जाऊन चौकशी केली, पण त्यांनाही रोशनबद्दल अजिबात संशय नव्हता. रात्री आठ वाजता तो परत आल्यावरच काय ते समजू शकेल, असा विचार पोलिसांनी केला. तोपर्यंत सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज, वॉचमनकडे चौकशी करण्यात आली. सोसायटीचा सीसीटीव्ही दोनच दिवसांपूर्वी बंद पडला होता आणि
वॉचमननेही कुणाला आत येताना बघितलं नव्हतं. आता चोरीबद्दल चौकशी करण्यासाठी एकच माणूस शिल्लक होता, तो म्हणजे रोशन.
आठ वाजता येणारा रोशन नऊ वाजेपर्यंत आला नाही, तेव्हा मानकर दांपत्यालाही काळजी वाटायला लागली आणि खरंच त्यानेच चोरी केली नसेल ना, असा संशयही गडद झाला. रात्री उशिरापर्यंत तो आला नाही, तेव्हा त्यांनी पोलिसांना खबर द्यायचं ठरवलं.
रोशन १५ वर्षांचा आहे, तेव्हा तो एकट्यानं चोरी करणार नाही, त्याचे साथीदार नक्की असणार, अशी पोलिसांना खात्री होती.
रोशन मामाकडे गेला असावा काय, असा पोलिसांना आधी संशय आला, म्हणून मामा ज्या वस्तीत राहत होता, तिथे शोध घेतला गेला. मामा तिथून दोन महिन्यांपूर्वीच घर सोडून गेल्याचं समजलं. आता तो कुठे राहतो, याची काहीच कल्पना कुणाला नव्हती. शिवाय रोशन मामाला पुन्हा भेटेल, अशी शक्यताही वाटत नव्हती.
कुठल्या दिशेनं तपास करावा, पोलिसांना काही कळत नव्हतं. मात्र, रोशनविषयी जेवढी माहिती काढता येईल, तेवढी काढण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू ठेवले होते. चार दिवसांनी त्यांच्या प्रयत्नांना थोडंसं यश आलं.
जवळच्याच एका बिल्डिंगमध्ये झाडूकाम करणार्या माणसापर्यंत पोलिस पोहोचले, तेव्हा त्यानं रोशनला चार दिवसांपूर्वी त्याच्या मामाबरोबर रात्रीच्या वेळी स्टेशनच्या परिसरात बघितल्याची माहिती पोलिसांना दिली. स्टेशन परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रोशन आणि त्याचा मामा दोघंही दिसले. मानकर दांपत्यानं हे दोघं तेच असल्याची खात्रीही पटवली, तेव्हा पोलिसांनी त्या दिशेने आपला तपासाची सूत्रं वळवली.
मामाचा मोबाईल नंबर त्यांनी खबर्यांच्या मार्फत शोधून काढला. मामानं फोन बंद ठेवला होता, पण लोकेशनवरून तो बंगलोरला गेलाय, हे मात्र पोलिसांना समजलं. मामा आणि रोशनबरोबर त्या दिवशी स्टेशनवर आणखी एक माणूस होता, त्याच्याबद्दल मात्र कुणाला काही माहिती नव्हती. रोशन कोवळ्या वयात असल्यामुळे मामानं त्याला पुन्हा फितवलं असावं आणि त्याच्या मदतीनं चोरी करून आता तो पैसे उडवण्यासाठी आणि स्वतःला वाचवण्यासाठी इकडेतिकडे फिरत असावा, हे उघड होतं. रोशन मात्र पुन्हा त्याच्या नादाला कसा आणि का लागला, हे मानकर दांपत्याला कळत नव्हतं.
मामाचा सुगावा लागल्यावर पोलिसांनी बंगलोर पोलिसांना तशी माहिती कळवली. मामाला कुठला संशय आला की काय कुणास ठाऊक, पण मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे छापा घातल्यावर तो सापडला नाही. बहुधा त्यानं फोन कुठेतरी लपवून ठेवला होता, किंवा फेकून दिला होता. पोलिसांना रिकाम्या हातांनी परतावं लागलं. आता मामा आणि रोशनला शोधायचं कुठे, हा प्रश्नच होता.
त्यांचे सगळे ठावठिकाणे शोधूनही काहीच हाताला लागत नव्हतं. अशातच एके दिवशी हैदराबाद पोलिसांकडून आलेल्या फोनने मुंबई पोलिसांना दिलासा मिळाला. हैदराबाद पोलिसांनी मोकाट फिरत असलेल्या दोन चोरांना गस्तीच्या वेळी पकडलं होतं. त्यांच्याकडे भरपूर रोकड सापडली होती. पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यांच्यापैकी एकानं मुंबईत मोठा हात मारल्याचं कबूल केलं होतं. हैदराबाद पोलिसांनी तातडीने मुंबई पोलिसांशी संपर्क साधला.
मुंबई पोलिसांची टीम हैद्राबादला पोहोचली आणि दोघांचीही वेगवेगळी चौकशी करायचं ठरलं. त्यातला एक होता, प्रकाश ऊर्फ पक्या. त्यानंच दरोड्याची कबुली दिली होती. मानकरांच्याच घरात चोरी केल्याचं त्यानं कबूल केलं. मानकरांचा विश्वासू असलेल्या रोशनचाही या चोरीत हात होता, असं त्यानं सांगितलं, तेव्हा पोलिसांनाही आधी धक्का बसला. पोलिसांनी त्याच्याकडून सगळी माहिती काढून घेतली.
रोशन कोवळ्या वयात होता आणि अजून चांगल्या-वाईटाची त्याला पारख नव्हती. त्यातून आईवडिलांपासून दूर, मामाबरोबर तो मुंबईत आला होता. मानकरांकडे तो राहायला आल्यानंतर काही महिने मामापासून दूर होता. पण मामाला पैशांची चटक स्वस्थ बसू देत नव्हती. त्यानं रोशनला गाठलं आणि हळूहळू आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली. ज्या घरात राहतोस, तिथेच चोरी केली तर कुणाला कळणार नाही आणि आयुष्याची चिंता मिटेल, असं त्यानं रोशनला सांगायला सुरुवात केली. `मी तुझा मामा आहे,’ मला तुझी काळजी आहे, असं सांगून त्याला पटवलं.
रोशन पूर्णपणे आपल्या जाळ्यात सापडलाय, याची खात्री झाल्यावर मामानं त्याचा साथीदार म्हणून पक्याला सगळा प्लॅन सांगितला. मानकरांच्या घरात ते नसताना डल्ला मारायचा होता. त्यासाठी मामानं रोशनला घराची किल्ली मिळवण्यासाठी फितवलं होतं. रोशनने एके दिवशी घराची आणि तिजोरीची किल्ली आपल्या ताब्यात घेतली आणि त्याच दिवशी मामानं त्याची डुप्लिकेट किल्ली बनवून घेतली. घरी कुणीच नसेल, असा योग्य दिवस आणि योग्य वेळ रोशनने मामाला सांगितली. मामा पक्याला घेऊन डुप्लिकेट किल्लीने घरात घुसला. रोशनही बरोबर होताच. घरात घुसल्यावर मामा आणि पक्यानं थेट तिजोरीवर डल्ला मारला. ज्या घरानं आपल्याला प्रेम दिलं, आश्रय दिला, तिथेच चोरी करायला ह्यांना आपण मदत करतोय, हे रोशनला आत्ता पहिल्यांदा जाणवलं आणि तो घाबरला. त्यानं मामाला, पक्याला विरोध करायचा प्रयत्न केला, पण ते काही ऐकत नव्हते. तिजोरी अख्खी साफ करून ते रोशनसकट घराबाहेर पडले. वाटेत आपण कुणाला दिसणार नाही, कुणाला संशय येणार नाही, अशा सराईतपणे त्यांचा वावर होता. स्टेशनपाशी गाडी पकडून काही दिवस लांब कुठेतरी पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. मात्र स्टेशनजवळ कुणीतरी रोशनला बघितलं आणि तिथून पोलिसांना त्यांच्या तपासाचे धागेदोरे मिळाले.
पक्याबरोबर पकडला गेलेला दुसरा चोर म्हणजे रोशनचा मामा होता. त्यानंही चोरीचा गुन्हा कबूल केला. मात्र, गुन्ह्यासाठी मदत करणारा रोशन होता कुठे? पक्यानं सांगितलं, की वाटेत एका स्टेशनवर तो उतरला आणि पैसे घेऊन पळून गेला. बहुतेक घाबरला असावा. मामाला विचारल्यावर तो म्हणाला, रोशन बंगलोरपर्यंत आमच्याबरोबर आला आणि नंतर गायब झाला. दोघांच्या जबानीत तफावत होती, त्यामुळे पोलिसांना चटकन संशय आला.
या दोघांकडून जप्त केलेल्या ज्या वस्तू होत्या, त्या पाहताना पोलिसांना लक्षात आलं, की त्यात अशी एक अंगठी आहे, जी तिजोरीतून गायब झाल्याची नोंद नव्हती. ती पक्याच्या बोटात होता. पक्याची स्वतःची सोन्याची अंगठी असणं शक्यच नव्हतं. मानकरांना विचारल्यावर समजलं, की ही अंगठी त्यांनी रोशनला त्याच्या वाढदिवसाची भेट म्हणून दिली होती. पक्या ती आपल्या बोटात घालून मिरवत होता.
रोशन जर स्वतः पैसे घेऊन गायब झाला होता, तर त्याची अंगठी पक्याच्या बोटात कशी? पोलिसांच्या डोक्यातला संशय आणखी पक्का झाला. पक्याला पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यानं जी माहिती दिली, ती ऐकून पोलिसही हादरून गेले.
स्टेशनवरून बंगलोरची गाडी पकडल्यापासूनच रोशन अस्वस्थ होता. आपल्याच माणसांचे पैसे, दागिने लुबाडल्याबद्दल त्याचं मन त्याला खात होतं. `मी परत जाणार, घरच्यांची माफी मागणार, त्यांना सगळं सांगणार, ते मला माफ करतील,’ असं तो सारखं बरळत होता. मामानं त्याला समजवायचा प्रयत्न केला, पण तो ऐकत नव्हता. अखेर रात्रीच्या वेळी रेल्वेगाडी एका नदीच्या पुलावरून जात असताना मामानं पक्याला खूण केली आणि त्या दोघांनी बेसावध असलेल्या रोशनला गाडीतून खाली नदीत ढकलून दिलं. रोशनचा बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कर्नाटकमध्येच सापडला होता, पण बेवारस अशी नोंद झाली होती.
चुकीच्या संगतीतून रोशननं आपणच राहत असलेल्या घरात गुन्हा करायचा निर्णय घेतला होता. त्याला पश्चात्ताप झाला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. एका छोट्या चुकीबद्दल त्याला आयुष्याची किंमत चुकवावी लागली होती.