‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार…’ या संवादाची चर्चा चौकाचौकात आहे, आणि आता ‘चौक’ चित्रपटाचा खिळवून ठेवणारा ट्रेलर नुकताच हिंदुस्थानी भाऊंच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. वेगवान कथानक, चटपटीत संवाद, दर्जेदार अभिनय आणि उत्तम पार्श्वसंगीत या सगळ्या समीकरणामुळे ‘चौक’च्या ट्रेलरची चर्चा सगळीकडे आहे, आणि यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला चौक, चौकातले उत्सव, चौकातलं राजकारण, चौकातली निखळ मैत्री, चौकात जुळलेलं प्रेम, चौकावर असलेला सोशल मीडियाचा प्रभाव, चौकाने बघितलेल्या पिढ्या आणि याच चौकाने बघितलेले वाद या सगळ्याची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘चौक’! या मल्टिस्टारर चित्रपटात अनुभवी कलाकारमंडळी आणि जोडीला नवीन पिढीतील हरहुन्नरी कलाकार यांचा मिलाप बघायला मिळेल. वास्तववादी चित्रण आणि अगदी रोज आपल्या अजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि कानावर पडणारे संवाद ही चित्रपटाची जमेची बाजू आहे, यासोबतच संगीतकार साई-पियुष यांचं उत्कंठावर्धक पार्श्वसंगीतावरून या चित्रपटाचे वास्तव लक्षात येते.
‘चौक’च्या चित्रपटात प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, अक्षय टंकसाळे, संस्कृती बालगुडे या नव्या पिढीतील कलाकारांचा दर्जेदार अभिनय, बालकलाकार अरित्रा देवेंद्र गायकवाड यांचा समावेश आहे. चौकचा ट्रेलर लॉन्च सोहळ्याला चौक चित्रपटातील कलाकारांसोबतच सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे, अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेत्री स्मिता गोंदकर व आदी मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमादम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांनी देवेंद्र गायकवाड यांचे ‘डिरेक्टर्स क्लब’मध्ये वेलकम करणारा व्हिडिओ सादर करण्यात आला. तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी त्यांचं आणि चौकाचं नातं सांगितलं. ‘मराठी चित्रपट हरवला होता, पण पुन्हा एकदा मराठी चित्रपटाला उंचीवर आणण्याचं काम या लोकांनी केलं आहे.’ असं मत हिंदुस्थानी भाऊने व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या शेवटी किरण गायकवाडने डिजे होत सर्व पत्रकारांना आणि मान्यवरांना आपल्या संगीताच्या तालावर नाचवलं!
‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली असून, प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत. तर, चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे. या यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. चौक १९ मे रोजी राज्यातील प्रत्येक चौकातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
– संदेश कामेरकर