सोनी मनोरंजन वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘सरगम की साढेसाती’ या मालिकेतील कलाकारांच्या मोठ्या यादीत आता आणखी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा प्रवेश झाला आहे. ही अभिनेत्री म्हणजे मालिनी कपूर. मालिकेत ती सरगमच्या आईच्या म्हणजेच लताच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे तब्बल तीन वर्षांपेक्षा मोठ्या विश्रांतीनंतर मालिनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतली आहे. म्हणूनच या मालिकेचा भाग होताना तिला खूपच उत्साह वाटतोय.
ती म्हणते, तीन वर्षांच्या विरामानंतर पुन्हा एकदा सेटवर आल्यावर खूप छान वाटतेय. मी पहिल्यांदा कथानक आणि माझ्या व्यक्तिरेखेविषयी ऐकले तेव्हाच ठरवले की ही भूमिका करायचीच… मी साकारत असलेली लता ही दक्षिण दिल्लीत राहणारी उच्चभ्रू वर्गातली स्त्री आहे, जिची स्वतःची एक आर्ट गॅलरी आहे. ती सतत आपल्या मुलीचा विचार करून चिंतित असते, कारण गाझियाबादच्या एका चिंचोळ्या आणि गजबजलेल्या गल्लीत राहणार्या मध्यमवर्गीय संयुक्त कुटुंबात लग्न करण्याचा आपल्या मुलीचा निर्णय तिला मान्य नाही.