विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्र विकास आघाडीने भक्कमपणे आणि आक्रमकपणे प्रचार केल्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी व भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच समोरासमोर आल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या रणनीतीमुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची सरशी होणार असल्याचे सांगण्यात येते.
राज्यात पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात तसेच नागपूर पदवीधर, संभाजीनगर पदवीधर व अमरावती शिक्षक मतदारसंघ अशा पाच मतदारसंघांत 1 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने रंगणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या एकत्रित प्रचारामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार
महाविकास आघाडीतर्फे पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद मतदारसंघासाठी पाच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेकडून श्रीकांत देशपांडे, पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अरुण लाड, संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण, पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रा. जयंत आसगांवकर तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये बंडखोरी
या निवडणुकीत भाजपनेही या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पण भाजपमधील बंडखोरीमुळे मराठवाडय़ात भाजपला मोठा फटका बसणार आहे. संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक रमेश पोकळे यांनी बंडखोरी केल्यामुळे या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना फायदा होणार आहे
प्रमुख लढती
संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ
सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), शिरीष बोरनाळकर (भाजप), रमेश पोकळे (अपक्ष)
नागपूर पदवीधर मतदारसंघ
अभिजित वंजारी (राष्ट्रवादी काँग्रेस), संदीप जोशी (भाजप)
पुणे पदवीधर मतदारसंघ
अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस), संग्राम देशमुख (भाजप),
प्रा. शरद पाटील(जनता दल सेक्युलर),
अमरावती शिक्षक मतदारसंघ
प्रा. श्रीकांत देशपांडे (शिवसेना), डॉ. नितीन धांडे (भाजप)
पुणे शिक्षक मतदारसंघ
प्रा. जयंत आसगांवकर (काँग्रेस), जितेंद्र पवार (भाजप पुरस्पृत अपक्ष)
मतदानाची वेळ (स. 8 ते सायं. 5 )
निकाल जाहीर – 3 डिसेंबर
शिवसेनेची बाजू भक्कम
अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेकडून श्रीकांत देशपांडे रिंगणात आहेत. भाजपशिवाय विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक महासंघानेही उमेदवार रिंगणात उतरवले असले तरी शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांचे पारडे जड आहे.
मुख्यमंत्र्यांची ऑनलाइन सभा
या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन बैठकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
पुण्यात पेपरच्या आकाराची मतपत्रिका
पुणे पदवीधर मतदारसंघात तब्बल 62 उमेदवार रिंगणात मतपत्रिकेचा आकार एक वर्तमानपत्राच्या आकाराएवढा. एक बूथवरील 800 ते 900 मतपत्रिकांचे वजन सरासरी 32 ते 35 किलो. या मतपत्रिका मतपेटीत मावत नसल्याचे लक्षात आल्यावर मतपत्रिकेचा आकार कमी करावा लागला.
नागपुरात भाजपला फटका
नागपूर पदवीधर मतदारंघातील भाजपने विद्यमान आमदार अनिल सोले यांना उमेदवारी नाकारून महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे. त्याचा मोठा फटका भाजपला या मतदारसंघात बसून या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अॅड. अभिजित वंजारी यांना थेट फायदा होणार आहे. पुण्यातील रंगतदार लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जयंत आसगावकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपनेही उमेदवार रिंगणात उतरवला असून विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
सौजन्य- सामना