कोरोनाचा राक्षस नष्ट करून माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होऊ दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भराडी मातेला वंदन करून केली. माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे, असा आशीर्वाद भराडी देवीकडे मागताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाहीही दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोकणातील मसुरे-आंगणेवाडी, कोल्हापुरी पाटबंधारा योजना मालोड-मालडी, ता. मालवण तसेच लघु पाटबंधारे योजना कुंभवडे, ता. कणकवली या योजनांचे ऑनलाइन भूमिपूजन शनिवारी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम कोकणवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या भराडी मातेला वंदन केले. कोरोना काळात आंगणेवाडीच्या जत्रेत गर्दी करू नका या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी लाखो भाविकांना धन्यवाद दिले.
कोविड काळात आपण काम करत आहोत. अनेकजण भराडी देवीच्या उत्सवाची वाट पाहत आहेत मला माहीत आहे, पण आज आपण सगळेजण एकत्र येऊन कोरोना नामक संकटाचा मुकाबला करत आहात. आपण सगळे सहकार्य करत आहात म्हणून कोरोनाची दुसरी लाट आपण थोपवू शकत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेचे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक
अनेकजण स्वतःसाठी काही ना काही मागत असतात. पण मला आनंद आहे की, कोकणातील माझे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक, विश्वस्त म्हणून काम करत आहेत, स्वतःसाठी काही न मागता जनतेसाठी हॉस्पिटल आणि इतर गोष्टी मागत आहेत. रत्नागिरी येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कोकणचा विकास मार्गी लावणार
चिपीचे विमानतळ लवकरच सुरू होईल. ते सुरू केल्यानंतर मी तुमच्या मागे लागणार आणि विकासासाठी दरवाजे उघडण्याचे आवाहन करणार आहे. माझा कोकण संपन्न झालाच पाहिजे. यासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचे वचन भराडी देवीच्या साक्षीने माझ्या कोकणवासीयांना माता-भगिनींना देतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. भराडी मातेला वंदन करून प्रत्येकजण काही ना काही मागतो. पण मी भराडी मातेला विनंती करतो की, माझ्या शक्तीचा कण न् कण कोकणवासीयांसाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी वापरता येऊ दे, माझ्या हातून महाराष्ट्राचा विकास होऊ दे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सौजन्य : दैनिक सामना