चाळीतील ज्येष्ठ रहिवासी शांताराम सानप यांनी लेखी ठराव मांडला… लॉकडाऊनमुळे चाळीतील रखडलेली लग्नं राहता कामा नयेत. निदान यातील चार तरुणांची जमलेली लग्नं पन्नास जणांच्या उपस्थितीत एखादा जवळचा हॉल घेऊन लावून टाकावीत. पुढे लॉक डाऊन उठल्यावर आपण कमिटीतर्फे
थाटात स्वागत समारंभ करू. लॉकडाऊन उठायला आणखी वर्ष गेलं तर त्या समारंभाला कदाचित ही जोडपी आपल्या बाळांसह येतील, पण आता त्यांना जास्त वाट पाहायला लावू नका.
टमाट्याच्या चाळीला लग्न सोहळ्याचे वेध लागल्यापासून लॉक डाऊनच्या काळात आलेला शिथिलपणा कुठल्याकुठे पळून गेला. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला ठरलेली लग्नं २०२० च्या मेपासून डिसेंबरपर्यंत उरकण्याचा खास बेत होता; परंतु लॉक डाऊनने उपवर वधूवरांना सुरक्षित नव्हे तर दूर दूर अंतरावर ठेवलं. लग्नाचे हॉल आधी किमान एक वर्ष तरी बुक म्हणजे आरक्षित करावे लागत, त्याशिवाय केटरिंग, सजावट, रोषणाई याचीही आगाऊ अॅडव्हान्स रक्कम द्यावी लागते. टमाट्याच्या चाळीतली किमान सहा लग्नं तरी ठरली होती आणि २०२० मध्ये लग्नाचा बार उडणार होता, पण लॉक डाऊन घोषित झाला आणि सारंच मुसळ केरात गेलं. कारण टमाट्याच्या चाळीतलं कोणतंही लग्न हे आजूबाजूच्या इतर चाळीतल्या लग्नांपेक्षा नक्कीच वेगळं असायचं आणि त्याचं वेगळेपण हे कुणाच्याही लक्षात येण्यासारखं असे. गंमत म्हणजे ही सहाही लग्नं लव्ह मॅरेजेस म्हणजे प्रेमविवाह होते. चाळीतल्या चार प्रेमवीरांनी आमच्याच परिसरातल्या चार प्रेमांगनांना पटवलं होतं, तर चाळीतल्या दोघींनी शाळेत त्यांच्याच वर्गात असलेल्या बाजूच्या पाटीलवाडीतील दोघांची हृदयं चोरली होती. चाळीत कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, सत्यनारायणाची महापूजा असली की या उपवर वधूंच्या जोड्या अगदी नट्टापट्टा करून उत्सवात मिरवत असायच्या. कोणत्याही कार्यक्रमातही अगदी हौसेने भाग घ्यायच्या. आपल्याच घरातलं कार्य आहे, असं समजून चाळकर्यांमध्ये इतक्या मिसळून जायच्या की, त्या जोडीपैकी एकजण दुसरीकडचा पाहुणा किंवा पाहुणी आहे हे लक्षातही यायचं नाही.
एकदा तर एका सांस्कृतिक कार्यक्रमात तर या सहाही भावी जोड्यांचा सत्कारही करण्यात आला होता. त्या वेळी कार्यक्रमाच्या नृत्यसंयोजकाने तर त्यांना कार्यक्रमाआधी आठ दिवस दररोज रिहर्सलला बोलावून त्यांचे सामूहिक नृत्यही बसवून घेतलं होतं. सहा जोडपी एका गाण्यावर धमाल नाचत होती. ‘आज कल तेरे मेरे प्यार की चर्चा हर जुबानपर’ या अख्ख्या गाण्याचं मराठीकरण ‘आज काल तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा सार्या गावभर जगाला ठाऊक आहे, आपल्या प्रेमाची खबर’ हा मुखडा करून केलं होतं. वाद्यवृंदही जबरदस्त होता. तेव्हापासून ही जोडपी टमाट्याच्या चाळीचाच एक भाग झाली होती. लग्नाचे फक्त सोपस्कार बाकी होते, पण लॉक डाऊनने वाट लावली. लग्नाची ही बाब खासगी असली तरी तुळशीच्या लग्नानंतर चाळ कमिटीच्या सर्वसाधारण सभेत हा चाळीच्या सुख-दु:खाशी निगडित विषय चर्चेला घेण्यात आला.
चाळीतील ज्येष्ठ रहिवासी शांताराम सानप यांनी लेखी ठराव मांडला… लॉकडाऊनमुळे चाळीतील रखडलेली लग्नं राहता कामा नयेत. निदान यातील चार तरुणांची जमलेली लग्नं पन्नास जणांच्या उपस्थितीत एखादा जवळचा हॉल घेऊन लावून टाकावीत. पुढे लॉकडाऊन उठल्यावर आपण कमिटीतर्फे थाटात स्वागत समारंभ करू.
लॉकडाऊन उठायला आणखी वर्ष गेलं तर त्या समारंभाला कदाचित ही जोडपी आपल्या बाळांसह येतील, पण आता त्यांना जास्त वाट पाहायला लावू नका. छोट्या स्वरूपात काय ते उरकून घ्या, अशी माझी विनंती आहे… त्यांच्या या ठरावाला सदू मुणगेकरांनी जोरदार विरोध केला. ते म्हणाले, कसलेही संकट आले तरी चाळीतील लग्नं चाळीच्या प्रथेप्रमाणेच झाली पाहिजेत. आदल्या दिवशी हळदीचा जोरदार कार्यक्रम, कोंबडी बाजाच्या तालावर सर्व चाळकरी पुरुष आणि महिलांचा डान्स, खाण्यापिण्याची नेहमीसारखीच चंगळ दुसर्या दिवशी चाळीच्या पटांगणात जेवणावळ, नवर्यामुलाला वा मुलीला पांढर्या शुभ्र घोड्यावरून लग्नाच्या हॉलवर नेणे, आधुनिक मंगलाष्टकांच्या गाण्यावर लग्न, त्यानंतर बुफे, बँडच्या तालावर सर्व फेमस झिंगाट गाण्यांवर नाच करीत चाळकर्यांचा वरातीत सहभाग आणि रात्री चाळीत पुन्हा सामुदायिक भोजन असा साग्रसंगीत बेत ही परंपरा मोडता कामा नये…
– अहो, पण लॉकडाऊनमध्ये नियम मोडून अशा गोष्टी करता येत नाहीत.
– मग लॉक डाऊन संपल्यावर लग्नं करा, पण टमाट्याच्या चाळीच्या लग्नाची शान अबाधित राहायलाच पाहिजे. वाटल्यास आपण चाळ कमिटीतर्फे पंतप्रधानांना आपल्या लेटर हेडवर पत्र पाठवून या लग्नसोहळ्यासाठी विशेष परवानगी मागून घेऊ.
– च्याऐला, आपले नातेवाईक असल्यासारखाच बोलतोय. नियम सर्वांना सारखेच असतात. आपल्यासाठी नियम मोडायला आपण काही सरकारचे जावई नाही. तुम्हाला साध्या गोष्टी कशा कळत नाहीत, मुणगेकर.
– त्यात काय कळायचं? अहो, आपल्या चाळकमिटीच्या रेकॉर्डला पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राची नोंद तरी राहील. यापूर्वी कधी आपण इतक्या मोठया माणसांना पत्र पाठवलं होतं का?
– उद्या तुम्ही राष्ट्रपतींनाही कुठल्याही कामासाठी पत्र पाठवाल. हा लग्नाचा विषय इतक्या उच्च पातळीवर न्यायची जरूरी आहे का?
– माझा मुणगेकरांना पाठिंबा आहे. आपल्या चाळीतील लग्न चाळीच्या प्रथेप्रमाणेच झाली पाहिजेत. माझ्या मुलाचे लग्न आठवा. खुद्द आम्ही नवरा-बायकोंनी नाचण्याची हौस भागवून घेतली होती तेव्हा.
– तुम्ही काय, कीक लागली की कुठेही नाचू लागता.
– हे बघा, असं वाईटसाईट बोलायचं काम नाही. हा चाळीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कधी नव्हे ती एकदम सहा लग्नं उरकायचीत. ती काही भातुकलीच्या खेळांसारखी नाही. या प्रत्येक लग्नामागे इतरांनी आदर्श ठेवावा, अशी लव्ह स्टोरी आहे आणि या प्रेमिकांनी काही लपून छपून प्रेम केलेलं नाही. बस स्टॉपवर किंवा त्या लव्ह गार्डनमध्ये. त्या प्रत्येकाची लव्ह स्टोरी ऐकाल तर काटा उभा राहील तुमच्या अंगावर. ही सगळी प्रेमप्रकरणं आहेत ती संकटाच्या काळात एकमेकांच्या कुटुंबांना मदत करण्याच्या उदात्त हेतूतून निर्माण झालेली.
त्यामागे सेवाभावना आहे. आपल्या चाळीतले चारही उपवर तरुण त्यांच्या भावी वधूच्या कुटुंबात कमावते कोणीही नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाना आर्थिक मदत करतात. तसेच आपल्या चाळीतील दोन कुटुंबांचे पालकत्वही शेजारच्या चाळीतील दोन तरुणांनी स्वीकारून दोन मुलींशी लग्न करण्याचा प्रस्तावही स्वीकारला आहे.
या भावनेचा सन्मान तिला साजेल असा करायला हवा. तो एक आनंद सोहळा व्हायला हवा. चाळीतल्या पूर्वीच्या लग्नांची सारी धामधूम त्यात हवी. पूर्ण लॉकडाऊन तर उठणारच आहे २०२१ मध्ये. आजपर्यंत जशी कळ सोसलीत तशीच आणखी थोडी सोसा. मग देऊ उडवून धूमधडाक्यात सहाही सामूहिक लग्नांचा बार… लग्नाच्या खर्चाचा भार आपण सर्व चाळकर्यांनी उचलू. कसं?
खरं आहे. मुणगेकर सर्वांच्या कायमचा लक्षात राहील, असा करू सोहळा. आता एकमताने ठराव मंजूर करूया आणि पुढल्या वर्षाची वाट पाहूया!