आतापर्यंत कणखर, कठोर आणि निग्रही भूमिका साकारणारा अभिनेता अमित सियाल आपली प्रत्येक भूमिका बारकाव्यानिशी साकारतो. म्हणूनच त्याच्या भूमिकांसाठी आणि गहिऱ्या अभिनयासाठी प्रेक्षकांची वाहवा मिळते. आताही तो ‘काठमांडू कनेक्शन’ नावाच्या वेबसिरीजमध्ये काम करतोय. ही वेबसिरीज सोनी लिव्ह अॅपवर एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. या मालिकेमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करणाऱ्या अमितने या मालिकेतील प्रत्येक प्रसंग अचूक साकारला जावा प्रचंड मेहनत घेतली आहे. मालिकेमध्ये कॅसिनोमध्ये घडणाऱ्या एका प्रसंगात अमितची व्यक्तिरेखा पोकरचा डाव खेळताना दाखविण्यात आली आहे. अमितने हा खेळ पूर्वी कधीही खेळलेला नसल्याने आजूबाजूच्या लोकांकडून त्याने तो शिकून घ्यायचे ठरवले. पण पोकरचे जुजबी धडे गिरवून अमित थांबला नाही, तर व्यावसायिक सफाईने हा खेळ खेळणाऱ्यांकडून योग्य प्रकारे पोकर कसा खेळावा हे समजून घेत या खेळाबद्दलची आपली समज चांगलीच वाढवली. यातला गंमतीचा भाग म्हणजे अमितने भूमिकेची गरज म्हणून शिकून घेतलेला हा खेळ आता या मालिकेतील अन्य कलाकारांसाठीही फावल्या वेळेतला आवडता विरंगुळा ठरला.