ठाण्यातील सुप्रसिद्ध अशा मामलेदार मिसळचे मालक लक्ष्ण मुरडेश्वर यांचे निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. 15 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं निदान झाल्यापासून त्यांची प्रकृती खालावली होती. मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण मुरडेश्वर यांची प्रकृती खालावली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर ठाण्यातील कौशल्य रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारपर्यंत ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र, मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि नातंवडे असा परिवार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून खवय्यांना मामलेदारच्या मिसळने भुरळ घातली आहे. ठाणे शहराच्या अनेक ओळखींपैकी एक असलेल्या मामलेदार मिसळीची सुरुवात 1992पासून झाली. ठाण्यातील मामलेदार कचेरीबाहेर असलेल्या कॅन्टिनची जागा लक्ष्मण मुरुडेश्वर यांचे वडील नरसिंह मुरुडेश्वर यांना 99 वर्षांच्या करारावर मिळाली होती. अवघ्या 50 चौरसफुटांच्या जागेतून सुरू झालेलं हे छोटेखानी हॉटेल आता 500 चौरसफुटाच्या जागेत गेलं आहे.
नरसिंह मुर्डेश्वर यांच्या पश्चात लक्ष्मण यांनी वडिलांची खवय्यांच्या सेवेची परंपरा अखंडीत सुरू ठेवली आणि आपल्या मिसळीच्या चवीला त्यांना सातासमुद्रापार नेऊन ठेवलं. त्यांच्या निधनानंतर ठाण्यातील व्यापारी आणि मामलेदार मिसळीच्या खवय्या चाहतावर्गात शोककळा पसरली आहे.
सौजन्य- सामना