वर्षानुवर्षे रखडलेल्या शहराच्या हद्दवाढीसाठी आता पुन्हा एकदा प्रशासकीय आणि जनआंदोलनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी सकारात्मकता दर्शविल्यानंतर हद्दवाढ कृती समितीनेही पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यातूनच हद्दवाढीनंतरच महानगरपालिकेची निवडणूक, घ्या असा आक्रमक सूर काल सायंकाळी झालेल्या बैठकीत निघाला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला.
शिवसेना नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हा दौऱयाची सुरुवातच महानगरपालिकेत बैठक घेऊन केली. महापालिकेच्या इतिहासात नगरविकास खात्याचा मंत्री प्रथमच येण्याची ही पहिलीच घटना ठरली. महापालिकेच्या रखडलेल्या कामकाजासह वर्षानुवर्षे रखडलेल्या हद्दवाढीसंदर्भातही त्यांनी आढावा घेतला. हद्दवाढीचा फेरप्रस्ताव देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. गावांचाही विचार करून त्यांना विश्वासात घेऊनच ही हद्दवाढ करण्याची ग्वाही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या हद्दवाढीसंदर्भात उचलेल्या पावलामुळे शहरासह समाविष्ट होणाऱया तीन औद्योगिक वसाहती आणि 42 गावांच्या आजवर रखडलेल्या विकासाला चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. हद्दवाढीचा फेरप्रस्ताव शासनाला पाठविण्यासाठी महापालिका प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. तशाच हालचाली आता जनआंदोलनातूनही दिसून येऊ लागल्या आहेत. यासंदर्भात कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीची बैठक होऊन, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच, 2013 च्या प्रस्तावाच्या फायलीवरील धूळ झटकून आठ दिवसांत हद्दवाढीचा फेरप्रस्ताव पाठविण्यासह ‘आता नाही, तर पुन्हा नाही’प्रमाणे व्यापक जनआंदोलनातून जिह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना यासाठी गळ घालण्याचा प्रयत्न कृती समितीकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला. हद्दवाढीशिवाय महानगरपालिकेची निवडणूक नको असा सूरही या बैठकीत निघाला.