जो समाज पुस्तकांची दुकानं जिवंत ठेवू शकत नाही तो समृद्ध समाज कधीच होऊ शकत नाही आणि तोच समाज आपण होत चाललो आहोत. यापुढे अशीच पुस्तकांची दुकानं आपल्याच पुस्तक वाचनाच्या उदासीनते मुळे, निरक्षरते मुळे बंद पडत जातील… जी अडचणीची पुस्तकं असतील त्यांवर सेन्सरशिप लादली जाईल, आणि एक दिवस लोकांना घाबरवण्यासाठी पुस्तकांची सार्वजनिक होळी करून `पुस्तक’नावाची वस्तूच नष्ट केली जाईल…
काही दिवसांपूर्वी अचानक तीन कलावंत मित्रांचे मृत्यू झाले. पाठोपाठ आणखी एका ‘अपमृत्यू’ची बातमी आली…
`फोर्टच्या आगीत आख्खा किताबखाना जळून खाक!’
आधीच चांगल्या पुस्तकांची दुकानं मुंबईत नाहीत… सगळीकडे क्रॉसवर्ड… तेही इकडूनतिकडे तिकडूनइकडे दिसत राहतं. काही वर्षांपूर्वी बँड्रा वेस्टला एसव्ही रोडवरच `लोटस’ नावाचं पुस्तकांचं दुकान होतं. गोविंद निहलानीजींनी मला (तेव्हा मी त्यांचं प्रोडक्शन बघत होतो) लोटसला काही पुस्तकं कलेक्ट करायला पाठवलं होतं. त्या पूर्वी आयडियल आणि मॅजेस्टिक पाहिलेला मी एसीच्या गारठ्यात सुखावलेली पुस्तकं हरखून पाहात होतो. गोविंदजींच्या घरी त्याआधी पाहिलेले कितीतरी जागतिक लेखक तिथे हातात हात घालून थंडगार शेल्व्हज्मध्ये उभे असलेले दिसले… कितीतरी वेळ ती पुस्तकं चाळत उभा होतो आणि अचानक एक सुंदरी लांबट ग्लासातून सोनेरी वाईन घेऊन आली…
`सर…’ माझ्यासमोर ट्रे करत ती मला म्हणाली.
मी बावचळून तो ग्लास घेतला… ती निघून गेल्यावर एकेक घुटका घेत मी पुन्हा पुस्तकं पाहू लागलो… `विराट चांडोक’ नावाचा ….नावाला जागणारा `विराट’ वाचन असलेला सेल्समन तिथे भेटला, जवळ जवळ तिथली सगळीच पुस्तकं वाचल्यागत पुस्तकांची, लेखकांची माहिती उत्साहात देत होता…त्यानंतर कितीतरी वेळा गोविंदजींनी न पाठवताही मी तिथे जाऊ लागलो. पुस्तकांच्या किमतींमुळे विकत घेण्याचा प्रश्नच नव्हता. तिथे उभ्या उभ्या कितीतरी पुस्तकं अर्धीमुर्धी मी वाचूनही काढली होती.
आणि एक दिवस `अचानक’ कळलं `लोटस’ बंद झालं.
बातमी ऐकून मन खिन्न झालं.
मग अंधेरी वेस्ट इन्फिनिटीमधलं प्रशस्तं असं `लँडमार्क’ आयुष्यात आलं. प्रशस्त आणि वेगळी पुस्तकं मिळणारं दुकान. एका मोठ्ठ्याशा मॉलमध्ये… घरापासून जवळ. कामाच्या येत्याजात्या मार्गावर. तिथेही आयुष्यातला बराच भाग पुस्तकं चाळण्यात, विकत घेण्यात गेला.
आणि एक दिवस `अचानक’ तेही बंद झाल्याचं कळलं .. पुस्तकांच्या दुकानाजागी कुठल्या तरी इंटरनॅशनल ब्रॅण्डच्या कपड्यांचं दुकान उभं राहिलं…
मग कधीतरी …टाऊनमध्ये `वे वर्ड अँड वाईज’ नावाचं अतिशय रेअर पुस्तकांचं दुकान झाल्याचं कळालं… मी, निखिलेश (चित्रे), स्वप्नील एक दिवस ठरवून तिथे गेलो… फारच वेगळ्या आणि दुर्मिळ पुस्तकांचं ते जणू भांडारच होतं… आणि इतक्या वर्षांच्या गॅपनंतर तिथल्या काऊंटरवर दिसला तो विराट वाचन असलेला विराट चंडोकच.
पुस्तकांच्या दुकानात हरवलेलं पैशांचं पाकीट तो पुस्तकांच्या दुकानातच शोधत होता. तिथेही तो आवर्जून प्रत्येक पुस्तकाबद्दल, लेखकांबद्दल खूप उत्साहाने सांगत होता…
तिघांनी मिळून जवळ जवळ तेवीस हजारांच्या आसपास खरेदी केली होती. आणि बाय द वे… तिथंही मालकाने इतकी खरेदी पाहून आमच्यासाठी महागड्या वाईनची बाटली उघडली होती.
मग कधीही टाऊनला गेलो की वे वर्डमध्ये चक्कर ठरलेलीच असायची.
आणि एक दिवस `अचानक’ कळलं वे वर्ड बंद झालं.
त्याआधी जुनं जाणतं स्ट्रॅन्ड बंद झालं होतं … त्या आधी खूप चर्चगेटपासून फ्लोरा फाऊंटनपर्यंत मांडलेला, जुन्या पुस्तकांचा बाजार उठवण्यात आला होता. लोकवाड्मयचं पीपीएच तेवढं सुरूय अजून.
आणि आज `अचानक’ किताबखाना जळाल्याचं कळलं. `फोर्टच्या आगीत किताबखाना जळून खाक’
या बातमीने एकदम मला ‘फॅरेनहीट ४५१’ची आठवण झाली. ज्यात ज्यो माँटँग नावाचा अग्निशमन दलात काम करणारा कामगार राज्याच्या पुस्तकांवर बंदी आणून, जाळण्याच्या सेन्सरशिप कायद्यालाच उलटा प्रश्न विचारतो. ब्रॅडबरी नावाच्या जागतिक कीर्तीच्या लेखकाच्या याच नावाच्या कथेवर २००० ते २००९ अशी बंदी आणण्यात आली होती.
एखादी व्यवस्था जेव्हा पुस्तकातल्या मजकुरावर आक्षेप घेत पुस्तकच बॅन करते तेव्हा त्या पुस्तकातल्या मजकुराचा त्या व्यवस्थेने नक्कीच धसका घेतलेला असतो. आणि ते पुस्तक वाचून समाजात काही विचारमंथन होऊन खळबळ माजेल, लोक शहाणे होतील किंवा वेडे होतील, या दोन्ही शक्यतांना गृहीत धरत आपल्या स्थानाला धक्का पोहोचू नये वा विचारसरणीच्या विरोधातले विचार मांडले जाऊ नयेत म्हणून जेव्हा शासन पुस्तक बॅन करण्याचा वा जाळण्याचा निर्णय घेतं तेव्हा, ते पुस्तक समाजात मोठ्या प्रमाणात `वाचलं’ जाईल हे शासनाने गृहीत धरलेलं असतं.
पण आपल्याकडे लोक पुस्तकं वाचतच नाहीत म्हणून लोटस, स्ट्रॅन्ड, लँडमार्क, वे वर्ड वाईज आणि जुन्या पुस्तकांची दुकानही बंद होताहेत.
जो समाज पुस्तकांची दुकानं जिवंत ठेवू शकत नाही तो समृद्ध समाज कधीच होऊ शकत नाही आणि तोच समाज आपण होत चाललो आहोत.
यापुढे अशीच पुस्तकांची दुकानं आपल्याच पुस्तक वाचनाच्या उदासीनतेमुळे, निरक्षरते मुळे बंद पडत जातील… जी अडचणीची पुस्तकं असतील त्यांवर सेन्सरशिप लादली जाईल, आणि एक दिवस लोकांना घाबरवण्यासाठी पुस्तकांची सार्वजनिक होळी करून `पुस्तक’नावाची वस्तूच नष्ट केली जाईल…
कदाचित अशी वेळ येईल… तुमच्या माझ्यासारख्यांच्या, घरांच्या भिंतींना सुशिक्षित वाटावं म्हणून डिझाईनच्या नावा खालीच्या काही उच्च-वर्गीयांच्या, काही तथाकथित बुद्धिवाद्यांच्या घरी जी पुस्तकं उरली असतील, तेवढीच काही ती खूण उरलेली असेल एक `पुस्तक’ म्हणून.
(तसंही डिजिटलायझेशन आपल्या माथी बसलेलंच आहे…एका किंडल आयपॅडमध्ये हजारो पुस्तकं मावताहेत … अवकाशातल्या माहितीचा कचरा दिवसेंदिवस वाढतोच आहे … एक दिवस त्याचीही विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न निर्माण होईल… अवकाशात कचरा आणि जमिनीवर ऑटोमेशन, संगणकीय जगणं… यांच्यात कागद कुठे असेल!)
पुस्तकाची दुकानं चालत नाहीतच्या कारणे पुस्तकांची दुकानं बंद पडताहेत अशा कुपोषित काळात आपण जगत आहोत.
पुस्तकांच्या दुकानांच्या जागा इंटरनॅशनल ब्रॅण्डच्या कपड्यांच्या कंपन्यांनी विकत घेण्याच्या ग्लोबलाईज्ड काळात आपण जगत आहोत.
`या रे… वाचा रे … यावर ते पुस्तक फुकट घ्या रे…’ अशा नवनवीन कल्पना जाहीर करत सतत लोकांना वाचनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पुस्तक विक्रेत्यांनी भीक मागितल्यासारखं करत राहण्याच्या दयनीय काळात आपण जगत आहोत.
पुस्तकांची दुकानं जळून खाक होण्याच्या या `अभद्र’ करोना काळात आपण जगतो आहोत.
पुस्तकांची दुकानं उगाच जळत नसतात
प्रचंड काही उलथापालथ चाललेली असते
साक्षरांना निरक्षर करण्याची समाजात
पुस्तकांची दुकानं वाट पाहत असतात
कुणीच न आल्याने निराश झालेल्या
मालकासाठी सवलतीतही उभी राहतात
पुस्तकांची दुकानं आपोआप जळत नाहीत
कुठेतरी कुणीतरी फार आधी चूड लावून
गेलेलं असतं ज्ञानाच्या खोल खोल खाईत
पुस्तकांची दुकानं झाडं आठवत बसतात
कागदांसाठी हळहळतात
आठवणींच्या जंगलांत
एकेक अक्षर आत्महत्या करतं
वाळवीच्या मुखात
पुस्तकांची दुकानं बंद होणं
पुस्तकांची राख वाचकाच्या डोळ्यात मोतीबिंदू होणं
कुणीच वाचलं न जाऊन विरत नष्ट होणं
हा त्या समाजाला पुस्तकांचा शाप असतो.
पुस्तकांचं दुकान जळणं ही एक सामाजिक घटना असते.
ही कशाची तरी सुरुवात असते
पुस्तकांची दुकानं
उगाच जळत नसतात…