खेड तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या ३५१ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ६८५ उमेदवारांचे राजकिय भवितव्य आज मतदार संघातील ६२,४२४ मतदारांनी मतपेटीत बंद केले. मतदानाची वेळ संपली तेव्हा तालुक्यातील ७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. भरणे ग्रामपंचायतीच्या निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मारहाण केल्याने निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागले. खेड पोलिसात याबाबत परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
खेड तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतीचे कार्यकाळ संपल्याने सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. २३ डिसेंबर २०२० ते ३० डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करणे, ४ जानेवारी २०२१ उमेदवारी अर्ज मागे घेणे, १५ जानेवारी प्रत्यक्ष मतदान आणि १८ जानेवारी निकाल असा निवडणुक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता.
निवडणुका जाहीर झालेल्या ८७ ग्रामपंचायतींपैकी २३ ग्रामपंचायती आणि ३३० उमेदवार बिनविरोध झाल्याने आज ६४ ग्रामपंचायतीच्या ३५१ जागांसाठी प्रत्यक्ष निवडणुक प्रक्रिया राबविण्यात आली. आज सकाळी ७.३० वाजता ६४ ग्रामपंचायतींच्या १५७ प्रभागातील १५८ मतदान केंद्रावर शांततेत निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांची बऱ्यापैकी गर्दी झाल्याचे चित्र होते. मात्र दुपारी मतदान केंद्रावरील गर्दी काहीशी रोडावली होती.