मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय, ते कसं सोडवू?
सुनीला सुतार, श्रीरामपूर
– तुमचाच फोन वापरत असतील तर, स्वतः इंटरनेटशिवाय चालणारा अत्यंत साधा बटणांचा फोन वापरायला सुरुवात करा.
झुमका गिरा रे बरेली के बाझार में… आता काय करायचं?
अश्विनी सौंदळकर, माजिवडा, ठाणे
– दुसराही तिथेच फेकायचा; म्हणजे पहिला ज्याला मिळालाय त्याला पूर्ण सेट तरी मिळेल. आणि एवढ्या तडमडत लांब त्या बरेलीच्या बाजारात जायचं म्हटल्यावर शॉपिंग न करता घरी कोण परत येतंय?
चांदणे असूनही रात्र काळी केव्हा वाटते माणसाला?
अभय होंबळकर, बेळगाव
– डोळे बंद करून गाढ झोपणार्याला.
दिवस चांगला जाण्यासाठी काय करावे?
अशोक परब, ठाणे
– पोट साफ होईल याची आदल्या रात्री काळजी घ्यावी.
नावात काय आहे, असं शेक्सपियर म्हणून गेला आहे… तुम्ही काय म्हणता?
अशोक कोर्टीकर, सोलापूर
– नावात काय आहे? असं शेक्सपियर म्हणतो; आणि हल्ली आडनावांतच सगळं आहे! असं मी म्हणतो.
हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाये… असं झालं तर?
सुनयना खांबेटे, कराड
– सीआयडीच्या दयाला बोलवायचं.
माणसाच्या पाठीला डोळे असते तर?
श्रीपाद पेंढारकर, चिंचवड, पुणे
– तो सतत तोंडावर आपटला असता.
तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता की सोन्यात?
सचिन कुलकर्णी, नाशिक
– रमी, जुगार, दुपटी तिपटीच्या स्कीम्स, माहित नसलेल्या जमिनी सोडून सगळीकडे.
जास्त नाटकं करू नकोस, असं कुणी तुम्हाला म्हटलं आहे का कधी?
सोपान राऊत, पालघर
– या क्षेत्रात आल्यापासून असं म्हणायची मी संधीच कुणाला दिली नाही.
‘अमर, अकबर, अँथनी’ या सिनेमाच्या रिमेकमध्ये कोणती भूमिका साकारायला आवडेल तुम्हाला?
निशांत डोंगरे, नगर
– परीक्षकाची
अभिनय करण्याची संधी मिळाली नसती तर तुम्ही काय काम केले असते?
सोनाली कुलकर्णी, सातारा
– ही अभिनयाची संधी परत कशी मिळेल यासाठी नव्याने प्रयत्न केले असते. एरव्ही अभिनयाव्यतिरिक्त जे करायचो ते मी आत्ताही करतोच आहे.
करोनाच्या विषयावर एक सिनेमा काढायचा आहे… दोनचार झकास शीर्षकं सुचवा की!
श्रीपती गुर्जर, परभणी
विनोदी असेल तर – ‘धुतल्या हातचा जावई’ किंवा ‘सून’
गंभीर असेल तर – शेवटचा श्वास
सामाजिक असेल तर – मास्कटदाबी
हॉरर असेल तर – शुकशुकाट
विरह कथा असेल तर – विलगीकरण
मारधाड, तद्दन कमर्शियल असेल तर – अनलॉक १,२,३
कौटुंबिक असेल तर – साबणाचे हात
ग्रामीण असेल तर- महामारीआईचा फेरा
समांतर असेल तर – पिंडरीवरचा वळ
बायोपिक असेल तर – सॅनिटाईझ्ड
ऐतिहासिक असेल तर – लस फतेह
पौराणिक असेल तर – खाटप्रस्थाश्रम
सी ग्रेडचा असेल तर – आहे त्या बिळात वाटोळं
कमळाला फुलायला चिखलच का प्रिय असतो? चांगली जागा मानवत नाही का?
अनिल सरवणकर, पोलादपूर
– हिरा कोळशातून निघतो, मळीतून बियर निघते, मैलातून खत निघतं, शेणातून गॅस निघतो तर चिखलातून कमळ म्हणजे काहीच नाही…