हिंदुस्थान आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी मालिकेतील चेन्नईमध्ये होणारे पहिले दोन सामने प्रेक्षकांविना खेळविण्यात येणार आहेत. तामीळनाडू क्रिकेट संघटनेचे (टीएनसीए) सचिव आर. एस. रामास्वामी यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या प्रकोपानंतर हिंदुस्थानमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट रंगणार आहे. चेन्नईतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱया कसोटी सामन्यासाठी 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याबाबत विचार सुरू होता. मात्र कोरोनाचे संकट अद्यापि टळलेले नसल्याने ‘टीएनसीए’ने रिकाम्या स्टेडियमवर दोन कसोटी सामन्यांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.
कोरोनामुळे मार्चपासून हिंदुस्थानी चाहते क्रिकेटला मुकले आहेत. तब्बल 10 महिन्यांपासून क्रिकेटप्रेमी मैदानापासून दूर आहेत. कोरोनामुळे आयपीएलचा 13 वा हंगाम यूएईमध्ये घ्यावा लागला. इंग्लंडचा संघ हिंदुस्थान दौऱयावर येणार असल्यामुळे आता आपल्याला प्रत्यक्ष मैदानावर क्रिकेट बघायला मिळेल, असे हिंदुस्थानी चाहत्यांना वाटले होते. मात्र तामीळनाडू क्रिकेट संघटनेने आपल्याकडे होणाऱया दोन कसोटी सामन्यांचे प्रेक्षकांविना आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. टीएनसीचे सचिव एन. रामास्वामी म्हणाले, चेन्नईमध्ये कोरोनाचे संकट कायम असल्याने पहिल्या दोन कसोटी सामन्यांत नाइलाजाने प्रेक्षकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घ्यावा लागला. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूचनेनुसार हा निर्णय घ्यावा लागला. हिंदुस्थान आणि इंग्लंड मालिकेत खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करता कोणताही धोका न पत्करण्याचे ‘बीसीसीआय’ने ठरवले आहे.