घर, अंगण किंवा ऑफिसमध्ये साफसफाई करताना आपण झाडू किंवा खराटा वापरतो. हो ना… पण त्यांचा वापर आपण कसा करतो, तो कधी खरेदी करतो, तो तुटला तर काय करायचं…. वगैरे आपल्याला माहीत नसते. त्यासाठीच हा खटाटोप…
——————–
आर्थिक कटकटी टाळा
झाडू, खराटा या तशा दुर्लक्षित वस्तू… पण घर, ऑफिस, अंगण वगैरे साफ करण्यासाठी आपल्याला झाडू व खराट्याचा वापर करावाच लागतो. पण झाडू हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे हे लक्षात ठेवावे. लक्ष्मी घरात कायम नांदावी यासाठी झाडूचा, खराट्याचा वापर नीट करायचा असतो. लक्ष्मी प्रसन्न झाली तर ती घरात कायमचा वास करते हे वेगळे सांगायला नको. वास्तुशास्त्रानुसार झाडून काढण्याची वा झाडू ठेवण्याची पद्धत योग्य नसेल तर घरात नेहमीच आर्थिक कटकटी सुरू राहातात असे बोलले जाते.
शनिवार सर्वोत्तम
घर किंवा आपल्या ऑफिसमधला झाडू बरेच दिवस वापरला की छोटा होतो. तो नवीन खरेदी करण्याचे आपण ठरवतो. पण झाडू खरेदी करायचा तर शनिवारच सर्वोत्तम वार असतो हे लक्षात ठेवले पाहिजे. नव्या झाडूचा वापर करायला शनिवारीच सुरूवात करा. कारण शनिवार नव्या झाडूचा वापर करण्यासाठी उत्तम मानले जाते. घरात झाडू ठेवताना वा त्याचा वापर करताना वास्तुशास्त्राच्या दृष्टीने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण त्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घरातल्या सदस्यांवर कायम राहातो म्हणतात.
तुटलेल्या झाडूचा वापर नको
तुमच्या घरात जर झाडू तुटला, विखुरला गेला तर तर त्याचा वापर करू नका. तो पुन्हा बांधून काहीजण तो झाडू पुन्हा वापरू लागतात. पण वास्तुशास्त्रानुसार तुटलेला झाडू पुन्हा वापरणे चुकीचे आहे. झाडू, खराटा एकदा तुटला की तो पुन्हा जोडून वापरणे अशुभ मानले गेले आहे.
येथे झाडू ठेवू नये
झाडू ठेवण्यासाठीही खास एक विशिष्ट जागा ठरवून ठेवा. तो त्याच ठिकाणी रोज ठेवा. मात्र घरातील किमती सामान, दागदागिने, पैसाअडका ज्या ठिकाणी ठेवता तेथे चुकूनही झाडू ठेवू नका. चुकूनही या ठिकाणी झाडू ठेवाल तर व्यवसाय, संपत्तीवर दुष्परिणाम होईल हे विसरू नका.
झाडू उभा ठेवणे टाळा
झाडून झाले की, विशिष्ट जागी ठेवतानाही झाडू उभा ठेवू नका. तो जमिनीवर पाडलेल्या अवस्थेतच ठेवा. कारण उभ्या स्थितीत ठेवलेल्या झाडूमुळे अपशकून होतात असे वास्तुशास्त्राने म्हटले आहे. तुमच्या घरात बँक बॅलेन्स नेहमी कमी राहात असेल तर काहीवेळा घरात उभा झाडू हेही त्याचे एक कारण असू शकते.
संध्याकाळी झाडू नका
संध्याकाळच्या वेळी झाडून काढू नका असे आजी-आजोबा कानीकपाळी ओरडून सांगायचे, पण आपण लक्ष देत नाही. पण ते खरेच आहे. कारण असे केल्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते. यामुळे संध्याकाळी घर वा ऑफीसमध्ये कधीच झाडू नका. अगदीच नाईलाजाने झाडावे लागलेच तर साठलेला कचरा घराबाहेर टाकू नका. तेवढे तरी कराच.
झाडूला पाय लावू नका
झाडूला लक्ष्मीचा दर्जा दिला गेला आहे. त्यामुळे झाडूला पाय लावायचा नाही, पायाने झाडू दूर लोटायचा नाही हे पक्के लक्षात ठेवा. कारण को झाडूचा नाही, तर लक्ष्मीचा अपमान होतो. ज्या ठिकाणी अशा रीतीने झाडूचा अपमान होतो तेथे आर्थिक समस्या हमखास असतातच.