लेखक : श्रीकांत आंब्रे
नवर्याचा नेमका पगार किती हे माहिती अधिकारात बायकोला समजणार ही बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याबरोबर गंगाराम टमाट्याच्या चाळीतील बायकांमध्ये एकच आनंदाची लाट पसरली. आपल्या नवर्याला किती गलेलठ्ठ पगार आहे, हे दुसरीला फुशारक्या मारून सांगणार्या काही बायकांच्या चेहर्यावर मात्र आता सत्य सगळ्यांना समजणार म्हणून थोडी दु:खाची किनार होतीच. दुपारी फावल्या वेळात चाळीच्या व्हरांड्यात तांदूळ निवडता निवडता गप्पांना असा ऊत यायचा की विचारूच नका. चाळीतील तीन मजल्यावरील शंभर खोल्यांतील ताजी खबरबात काढून आल्यावर तिथे उपस्थित नसलेल्या बायकांची उणीधुणी काढण्याची स्पर्धाच लागायची. लॉकडाऊनच्या काळात तर नोकरीवर जाणार्या बायकांनाही भरपूर वेळ असल्यामुळे त्याही या तांदुळ-गप्पांच्या कार्यक्रमात सहभागी व्हायच्या. त्यामुळे चाळीतील ताज्या घडामोडींबाबत ज्ञानात भर पडायची आणि बातम्या ‘व्हायरल’ करायला अधिक मजा यायची.
केंद्रीय माहिती आयोगाकडे अनेक बायकांनी आपल्या नवर्याचा नेमका पगार किती हे जाणून घेण्यासाठी गार्हाणेवजा लेखी निवेदने दिल्यामुळे त्यांना ही मागणी मान्य करण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही. त्या केंद्रीय अधिकार्यांना गलेलठ्ठ पगार असला तरी त्यांच्याही काही बायकांना त्याविषयी नेमकी माहिती नसणार हेसुद्धा तितकेच खरे असल्यामुळे त्यांनीही आपल्या पतीराजांकडे याबाबतीत बायकांच्या मागणीला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.
नवर्याच्या पगाराबाबतची बातमी प्रसिद्ध झाल्यावर त्या दिवशी दुपारी तांदुळ निवडण्यासाठी जमलेल्या बायकांमध्ये त्या विषयावर चर्चेला जे तोंड फुटले ते बंद होण्याचे चिन्ह दिसेना. जो चाळीतल्या नको त्या बातम्या आपल्या मित्रांना सांगत सुटायचा तो विमलताईंचा दहा वर्षांचा बंडू त्या तांदुळ-बैठकीत आपल्या आईच्या बाजूला बसून तिला तांदूळ निवडायला मदत करण्याचं नाटक करता करता आपले कान त्या गृहिणींच्या चर्चेकडे लावून बसायचा आणि नंतर आपल्या मित्रमंडळींना तिखटमीठ लावून त्या चर्चेचा वृत्तांत सांगायचा. त्यामुळे पुढे बंडू हा एखाद्या चॅनेलचा किंवा वृपत्राचा वार्ताहर होणार याची खात्री सर्वांनाच होती. तर त्या दिवशी बंडूने अगदी नक्कल करत सांगितलेला त्या बैठकीचा वृत्तांत-
– कमलावैनी, तुमचे हे सांगतात का हो तुम्हाला त्यांच्या पगाराविषयी…
– म्हणजे?
– म्हणजे किती पगार हातात आला? पगारात किती वाढ झाली? या वर्षी नेमका बोनस किती मिळाला? प्रवासखर्चाचे किती पैसे मिळाले? लाचेखातर किती हातात आले?
– अहो, कसले भलते सलते आरोप करता? कोणी सांगितलं, माझा नवरा लाचखाऊ आहे म्हणून? तुमचा नवरा खात असेल लाच. माझा नवरा सगळा पगार माझ्या हातात देतो. मग मीच त्याला वरखर्चाला दर दिवशी ठराविक पैसे देते. त्यामुळेच तर बचत करून या वर्षी दिवाळीला कारसुद्धा बुक केलीय आम्ही.
– सगळेच नवरे तुमच्या नवर्यासारखे प्रामाणिक नसतात, कमलावैनी. आमचे हेच बघा. लग्न होऊन आज १५ वर्षे झाली, पण कधीही यांनी मला आपल्या पगाराचा नेमका आकडा सांगितला नाही. विचारलं की म्हणतात कसे, तुला दोन वेळचं जेवण मिळतं ना, कपडेलत्ते मिळतात ना, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागतोय ना, तुझी सगळी हौसमौज मी पुरवतोय ना, घरात आवश्यक त्या चैनीच्या वस्तू, दागदागिने ओहत ना! मग माझ्या पगाराच्या आकड्याविषयी जाणून घेऊन काय करायचंय तुला? मग मी गप्पच बसते!
– तुमचं बरं आहे हो. पण आमचे हे घरखर्चाला फक्त १५ हजार देतात आणि बाकीचे कुठे उडवतात ते नाही समजत. पगाराचा आकडाही सांगत नाहीत, आठवड्यातून यांची एक तरी पार्टी मित्रांबरोबर असते. मध्यरात्री टाइट होऊन घरी आले की तोंडातून एकही शब्द न काढता झोपी जातात. वाटतं प्यायल्यावर तरी खरं काय त काढून घेता येईल. पण पगाराचं नाव घेतलं की हूं की चूं करत नाहीत.
– आम्ही तर असं ऐकलंय चंद्राताई, की तुमचे मिस्टर पार्ट्या करत असले तरी तुमच्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालू आहे. पण त्या पहिल्या मजल्यावरच्या सुलभाताईंचा नवरा ऑफिसातल्या एका सुंद्रीवर खूप पैसे उडवतो म्हणे. एकदा चुकून तिची लिपस्टिक त्याच्या ब्रीफकेसमध्ये राहिली आणि सकाळी ऑफिसात जाताना ब्रीफकेसमध्ये कागद ठेवत असताना खाली जमिनीवर पडली आणि सुलभाताईंना सापडली आणि त्यानंतर जे रामायण-महाभारत त्या घरात झाले ते म्हणजे चाळकर्यांची मोठी करमणूक होती, ती लिपस्टिक नसून तो ऑफिसातला मार्कर चुकून बॅगेत राहिला, असं समर्थन तिचा नवरा देत होता. पण सुलभाताई म्हणत होत्या, इतके दिवस संशय होता, पण आता खात्रीच झाली. आता एकदा येते ऑफिसात आणि झिंज्याच उपटते तिच्या.
– उपटाच. पण असे कितीतरी नवरे आहेत की जे आपल्या पगाराचा अधिक हिस्सा आपल्या प्रेयसीवर खर्च करतात आणि घरात पत्नीची घरखर्चाची सारखी ओढाताण होते. अशा तक्रारी असलेली कितीतरी पत्रे सध्या माहिती आयोगाकडे आली असून म्हणूनच नवर्याच्या पगाराचा नेमका आकडा बायकोला माहिती अधिकारात कळण्याची तरतूद करण्याबाबत विचार सुरू असून ही तरतूद अंमलात येईल याची खात्री बाळगा.
– ती बनचुक्यांची मंजुळा नेहमी आपल्या नवर्याच्या पगाराविषयी फुशारक्या मारत असते. माझ्या नवर्याला वरची पोस्ट मिळाली, पगारात कधी पाच हजार, कधी दहा हजार तर कधी चक्क वीस हजार वाढ झाल्याच्या थापा मारते. आता हा नवीन कायदा आला की माहिती अधिकारात आपणच तिच्या नवर्याच्या खर्याखुर्या पगाराची माहिती काढू आणि खरे पूर्णसत्य चाळीसमोर आणू.
– तरीही आपला खरा पगार दुसर्याला कळू नये असं नोकरी करणार्या पुरुषांना जसं वाटतं तसं नोकरी करणार्या महिलांनाही वाटतं. ही पगार लपवण्याची मानसिकता सगळीकडेच आहे.
– असे मोठेमोठे शब्द नका वापरू. सवय बोला सवय. कसं असतं बाई, आपलं ठेवायचे झाकून आणि दुसर्याचं बघायचं वाकून ही रीतच आहे जगाची. पगार ही नवरा-बायकोच्या संसारातली एक रहस्यमय गोष्ट असते. काही बायकांना नवर्याचा पगार माहीत असतो, तर काही बायकांना नसतो. कधी कधी नोकरी करणार्या दोघांनाही एकमेकांचे पगार माहीत असतात आणि समजूतदारपणे दोघं संसारासाठी खर्चही करतात. पण काही नवरे घरी पगारच देत नाहीत. दारूत किंवा आणखी कसल्या व्यसनात उडवतात. बायकोने घरखर्चाला पैसे मागितल्यावर थोडेसे पैसे देतात. तर कधी देतही नाहीत. पगार संपला अशी उत्तरे बेफिकीरपणे देतात. अशा वेळी धीट बायका नाइलाजाने त्याच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना भेटून परिस्थिती सांगतात आणि वरिष्ठ सत्य जाणून दर महिन्याला त्या पत्नीला कामाच्या ठिकाणी येऊन नवर्याचा पगार घेऊन जाण्यास सांगतात, अशी बरीच उदाहरणे आहेत.
हो. खरं आहे. आपल्या चमेलीबाईचं उदाहरण त्यातलंच आहे. पण मला वाटतं, संसारात काय किंवा आणखी कुठे काय, लपवालपवी असतेच. संसार विश्वासाच्या पायावर चालतो असं म्हटलं तरी काही गोष्टी दोघांनाही एकमेकांपासून लपवून ठेवणं गरजेचं असतं. मात्र पैशाशिवाय संसार चालू शकत नाही. सगळी सोंगे आणता येतात, पण पैशाचं नाही. त्यामुळे पगार लपवून चालणारच नाही. एका अर्थी केंद्रीय माहिती आयोग माहिती अधिकारात नवर्याचा पगार जाणून घेण्याचा हक्क बायकोला देणार याबद्दल फक्त स्त्रियांनीच नव्हे, तर पुरुषांनीही आयोगाचं अभिनंदन करायला हवं. आता मात्र आपल्या तांदूळ-बैठकीतील नवर्याच्या पगारांविषयी अधूनमधून होणार्या चर्चेला कायमचा फाटा मिळेल, हे नक्की!