महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आडून भाजपा राज्य सरकारशी उघड युद्ध खेळत आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज येथे केला.
नाशिक येथे शिवसेना कार्यालयाच्या नूतनीकरण सोहळ्यानंतर त्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील शीतयुद्ध कधी थांबेल, या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, हे शीतयुद्ध नाही तर उघड युद्ध आहे. त्याकडे फक्त राज्य सरकार आणि राज्यपाल म्हणून पाहू नका. हे युद्ध राज्यपालांच्या आडून भाजपा खेळत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार मंत्रिमंडळाच्या शिफारशी राज्यपालांना बंधनकारक आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याचे टाळून राज्यपाल घटनेची पायमल्ली करीत आहेत, ते केवळ भाजपाच्या राजकीय दबावामुळेच. म्हणूनच हे उघड युद्ध आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाला कुणीही थांबवू शकत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी असे नाव दिले. आंदोलनाबाबत भाजपाची भूमिका बदलली आहे का, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, लोकशाहीमध्ये जनता आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर येते. राज्यकर्त्यांनी ते स्वीकारायला हवे. हुकूमशाही, लष्करशाही असलेल्या आपल्या बाजूच्या देशांमध्येही लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करतात. अमेरिकेत ट्रम्प यांच्या पराभवानंतर वॉशिंग्टन डीसीला जो धुडगूस झाला, तेसुद्धा आंदोलनच होते. जगभरात आंदोलनाला कुणीही थांबवू शकत नाही. भाजपाने शेतकऱयांचा आवाज ऐकायला हवा. आंदोलनांमधूनच भाजपाचाही जन्म झाला आहे, असेही खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोपांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या चौकशीतून सत्य बाहेर येईलच. कायद्याच्या चौकटीत चौकशी होईल, विरोधी पक्षाच्या दिशेने होणार नाही, असेही ते म्हणाले.