सोन्याच्या किंमतींमध्ये गेल्या काही काळात घसरण होताना दिसत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 56 हजारांच्या पार गेलेला सोन्याचा दर आता 50 हजारांच्याही खाली आला आहे. गेल्या सहा महिन्यात सोन्याच्या किंमतीत तब्बल 9 हजार 400 रुपयांची घसरण झाली आहे.
ऑगस्ट 2020 च्या पहिल्या आठवड्यात सोन्याच्या भावाने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडले होते. प्रति 10 ग्राम (1 तोळा) सोन्याचा दर 56 हजार 200 रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर मात्र सोन्याच्या भावात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या सहा महिन्यात 9 हजार 467 रुपयांची घसरण झाली असून दिल्ली सराफा बाजारात 10 ग्राम सोन्याचा दर 46 हजार 738 रुपयांपर्यंत खाली आला आहे.
अर्थसंकल्पानंतर घसरण
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकताच 1 फेब्रुवारीला 2021-22 या आर्थिक वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात सोन्याच्या सीमा शुल्कात घट केल्याने सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सरकारने सोने-चांदीवरील सीमा शुल्क 12.5 टक्क्यांवरून 7.5 टक्के करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे, त्यामुळेच या मौल्यवान धातूंच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे.
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ?
दरम्यान, सध्या लग्नसराईही सुरू असल्याने ग्राहक सराफा दुकानांकडे वळताना दिसत आहेत. मात्र भविष्यातील गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्याची हीच वेळ योग्य आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना सराफा बाजारातील तज्ज्ञ म्हणतात की, सोन्याचा दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. सध्या 46 हजारांवर असणारे सोने आगामी काही दिवसांमध्ये 42 हजारांवर येण्याचा अंदाज आहे. मात्र सणासुदीच्या दिवसांमध्ये हाच दर 50 हजारांचा आकडाही गाठू शकतो असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही घसरण
हिंदुस्थानी सराफा बाजारासह आंतरराष्ट्रीय मार्केटमध्येही सोन्याचा दर घसरला आहे. सोन्याचा दर सध्या 1 हजार 800 डॉलर प्रति औसच्याही खाली आला आहे. परंतु उद्योगधंदे सुरू झाल्याने व मागणीही वाढल्याने चांदीचे दर मात्र वाढताना दिसत आहेत.