जितेंद्र जोशीने ‘गोदावरी’ या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे हे सर्वांना माहीत आहेच. ‘पुणे-५२’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेला दिग्दर्शक निखिल महाजन यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल माध्यमांत रिलीज करण्यात आला आहे. हा सिनेमा महाराष्ट्र दिनी (१ मे) प्रदर्शित होणार आहे.
विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले, संजय मोने यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. कथा, पटकथा निखिल महाजन आणि प्राजक्त देशमुख यांची असून संवाद प्राजक्त देशमुख यांचे आहेत. जितेंद्र जोशीने लिहिलेल्या गीतांना ए. व्ही. प्रफुलचंद्र याने संगीत दिले आहे. कुटुंबातली नाती आणि वाहती नदी यांची सांगड असलेल्या चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा आहे. या चित्रपटाबाबत बोलताना निखिल महाजन म्हणाले, नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या एका कुटुंबाच्या आणि त्या नदीच्या जिव्हाळ्याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.