घनश्याम देशमुख (सोशल मीडियावरील ‘बोलक्या रेषां’च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले मुक्त व्यंगचित्रकार)
बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे त्यांच्या रेषांची ताकद. आताचे व्यंगचित्रकार कुंचला वापरत नाहीत, पेन, माऊस अशी वेगळी ‘शस्त्रं’ वापरतात. पण, बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांमध्ये त्यांच्या रेषांचे स्ट्रोक्स अतिशय ताकदीचे दिसतात. त्यांचा शरीररचनाशास्त्राचा अभ्यास दिसतो. त्यांच्या कुंचल्यातून उतरलेल्या व्यक्तिरेखा परिपूर्णच असतात आणि त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये अतिशय स्पष्टपणे, निर्भीडपणे व्यक्त केलेलं मत दिसतं. आताच्या व्यंगचित्रकारांना अशा प्रकारे व्यक्त होण्याची मुभा नाही, आताचा काळ अतिशय संवेदनशील बनला आहे. बाळासाहेबांचा काळ वेगळा होता आणि तेही कोणत्याही परिणामाला न घाबरता बोचरी टीका करायचे. म्हणूनच तर आम्हा व्यंगचित्रकारांचं त्यांच्यावर, त्यांच्या रेषेवर आजही तेवढंच प्रेम आहे.