संजय लीला भन्साळी आलिया भट्टसोबत ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा करत आहेत. पण या सिनेमाच्या कामात सतत अडचणीच येत आहेत. आताही तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता काय तर वास्तवातल्या गंगुबाईच्या नातलगांनी भन्साळी आणि आलिया यांच्यावर कोर्टात दावा ठोकला आहे. नातलगांनी या सिनेमाच्या कथानकावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी भन्साळी व आलियासोबतच लेखक हुसैन जैदी यांनाही कोर्टात खेचले आहे. मुंबईच्या सिव्हील कोर्टाने याबाबत या तिघांकडून 7 जानेवारीपर्यंत उत्तर मागवले आहे. हा सिनेमा प्रख्यात लेखत हुसैन जैदी यांच्याच ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या गाजलेल्या पुस्तकातल्या गंगुबाईच्या प्रकरणावर बेतलेला आहे. गंगुबाईही मुंबईतल्या काही माफिया क्वीन्सपैकी एक होती. तिला तिच्या पतीने केवळ 500 रूपयांसाठी विकून टाकले होते. नंतर ती वेश्यावृत्तीच्या व्यवसायात ओढली गेली. पुढे तिने असहाय्य आणि बेसहारा मुलींसाठी मोठे कार्य केले होते. आलिया भट्ट याच गंगुबाईची भूमिका साकारतेय.