राज्यातील 32 जिह्यांमधील नववी ते बारावीच्या 3 हजार 886 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्य़ांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे 4 जानेवारीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्य़ांची संख्या समोर आली आहे.
23 नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले असून आतापर्यंत 1 लाख 75 हजार 99 शिक्षक तर 73 हजार 418 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांपैकी अनुक्रमे 3 हजार 269 शिक्षक व 617 शिक्षकेतर कर्मचाऱ्य़ांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
सर्वाधिक कोरोनाबाधित शिक्षकांची संख्या गडचिरोली जिह्यात असून येथील 1 हजार 365 शिक्षक व 42 शिक्षकेतर कर्मचाऱ्य़ांना कोरोनाची लागण झाली. त्याखालोखाल सोलापूर 247 आणि 14, चंद्रपूर 244 आणि 120, पुणे 125 आणि 26, नागपूर 122 आणि 10, नगर 110 आणि 63, रायगड 94 आणि 42 तर मुंबई (डीवायडी) 21 आणि 20 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्य़ांना कोरोनाची लागण झाली.