मुंबईकरांसाठी मुंबई ही मायमाऊली आहे… मुंबईकरांचं तिच्याशी भावनिक नातं आहे… मुंबईबाहेरच्या काही लबाडांसाठी मात्र ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आणि ती आपल्या खुराड्यात डांबण्यासाठी त्यांचा जीव सतत तळमळत असतो. मुंबईतले मराठीजन आणि कष्टकरी अन्यप्रांतीय दर निवडणुकीत शिवसेनेच्या मागे भक्कमपणे उभे राहतात आणि ही कोंबडी कापून खाण्याच्या त्यांच्या इराद्यांवर पाणी पडतं. त्यामुळे अधूनमधून त्यांचा पोटशूळ उठत असतो.
मुंबईतून जाणार्या मनीऑर्डरींवर ज्यांची इतकी वर्षं गुजराण झाली अशा प्रांतांना मुंबईतली हिंदी चित्रपटसृष्टीच उचलून आपल्या राज्यात नेण्याची कल्पना सुचणं हा त्यातलाच प्रकार आहे.
मुळात एका अभिनेत्याच्या आत्महत्येला आपल्याला हवं तसं वळण देऊन महाराष्ट्रातल्या उमद्या नेतृत्त्वाचं भवितव्यच संपवून टाकण्याचा क्रूर डाव तडीला गेला नाही, म्हणून जी आदळआपट झाली त्यातून बाहेर पडलेलं हे मरतुकडं पिल्लू आहे. हिंदी सिनेमासृष्टी म्हणजे कुंडीत लावलेलं रोप किंवा भेळ-पाणीपुरीचा ठेला नाही इकडून तिकडे उचलून न्यायला. मुंबईने भरणपोषण करून एका दमदार वटवृक्षात रूपांतरित केलेल्या या चित्रपटसृष्टीला मोकळा श्वास घेण्यासाठी लागणारी स्वातंत्र्याची हवा आणि व्यावसायिक मूल्यांचं खतपाणी आपल्याकडे आहे का, याचा अदमास घेऊनच असले विचार करायला हवे होते. पण चाराण्याची भांग आजही जिथे राजरोस मिळते, तिथे अशा कल्पना सुचणारच.
हिंदी चित्रपटसृष्टीची नाळ मुंबईशीच का जुळली आहे आणि ती तोडणं का अशक्य आहे, हे हिंदी सिनेमा गाजवलेल्या आणि नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या लेखातून समजून जायला हरकत नाही. असले दळभद्री विचार सुचणार्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा परखड लेख आहे.
मुंबई म्हटली की जशी सिनेमासृष्टी आणि क्रिकेटची आठवण येते, त्याचप्रमाणे शिवसेनाही आठवतेच. गेली अनेक दशके सर्वभाषक मुंबईकरांचा विश्वास कमावून शिवसेनेने मुंबईची सत्ता एकहाती सांभाळली आहे. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख यांचं चित्रपटांच्या दुनियेशीही जवळचं नातं राहिलेलं आहे. कलावंताचं मन असलेले शिवसेनाप्रमुख सिनेमासृष्टीतील अनेक मान्यवरांसाठी आधारवड बनले होते. मुंबईत मराठी सिनेमांना थिएटर उपलब्ध करून देण्याचा मुद्दा असो की तामीळनाडूत हिंदी सिनेमांवर बंदी लादण्याचा निर्णय झाल्यावर त्यावर खणखणीत उत्तर देऊन तो डाव उलटवणे असो- चित्रपटसृष्टीवर जेव्हा जेव्हा संकट आलं, तेव्हा तेव्हा तिने बाळासाहेबांकडे हक्काने धाव घेतली आणि बाळासाहेबांनी कलावंतांच्या पाठीवर नेहमीच मायेचा आणि आधाराचा हात ठेवला. त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे अनेक कलावंतांशी त्यांची राजकारणापलीकडची व्यक्तिगत मैत्री होती.
एकीकडे भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी आक्रमक लढे उभारताना शिवसेनेने कधीही येथे आलेल्या अन्यप्रांतीय कष्टकर्यांचा आणि त्यांच्या कष्टांचा अनादर केला नाही.
न्यूयॉर्क हे जगाचं ‘मेल्टिंग पॉट’ आहे, असं मानलं जातं. म्हणजे जगभरातल्या संस्कृतींचा संगम न्यूयॉर्कमध्ये होतो आणि त्यांच्या सरमिसळीतून न्यूयॉर्कची एक उदारमतवादी, सर्वसमावेशक संस्कृती तयार होते. मुंबई हे आपल्या देशाचं ‘मेल्टिंग पॉट’ आहे हे लक्षात घेऊन इथली कॉस्मोपोलिटन, प्रागतिक, उदारमतवादी संस्कृती शिवसेनेने जपली. अशा सर्वसमावेशक वातावरणातच कोणतीही कला फुलू शकते, हे बाळासाहेबांना ठाऊक होतं. म्हणूनच आज मुंबईत वसलेली हिंदी चित्रपटसृष्टी जगातली सगळ्यात मोठी चित्रपटसृष्टी बनू शकली.
हिंदी ही सिनेमातल्या संवादांची भाषा आहे, ती आपल्या प्रांताची भाषा आहे म्हणून हिंदी सिनेमा आपल्याच भूमीत असणं योग्य आहे, असं शाळकरी गणित इथे येऊन मोठ्या झालेल्या काही कृतघ्नांनी मांडलं आहे. ते साफ चुकीचं आहे. हिंदी सिनेमाच्या प्रारंभिक काळातही हिंदी सिनेमाची लाहोर, मुंबई आणि कोलकाता ही तिन्ही केंद्रं हिंदीभाषक पट्ट्याच्या बाहेरच होती. कारण हा नुसता ‘हिंदी सिनेमा’ नव्हता, तो सगळ्या देशाच्या आशाआकांक्षा प्रतिबिंबित करणारा ‘हिंदुस्तानी’ सिनेमा होता. सगळ्या देशाला जोडणारी संपर्कभाषा हिंदी म्हणून तो हिंदीत, एवढाच त्याचा हिंदी भाषेशी संबंध होता आणि आजही तो तेवढाच आहे. हिंदी सिनेमासृष्टीचा प्रारंभ हिंदी पट्ट्यात झाला असता तर काय झालं असतं, ते कळण्यासाठी आजचे ‘भरगच्च’ भोजपुरी सिनेमे पाहायला हरकत नाही.
या देशाच्या आणि हिंदी भाषेच्या सुदैवाने तसं काही झालं नाही आणि भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ मुंबईत रोवली गेली. नाहीतर आजही हिंदी सिनेमाचं खुरटलेलं रोपटंच पाहायची वेळ आली असती, तिचा डेरेदार वृक्ष उभा राहिला नसता. पण हे त्या वृक्षाच्या सावलीत बसून, त्याची फळं चाखून टम्म फुगल्यावर तो वृक्षच उपटून नेण्याच्या बेईमान कल्पना सुचणार्यांना कळेल तो सुदिन. अन्यथा, मुंबईतून काही ना काही उपटून नेण्यासाठी धडपडणारे कसे आपल्याच तोंडावर आपटून दात पाडून घेतात, हे त्यांनाही कळून जाईल.