कायदा आणि सुव्यवस्थेचं आपलं एक पेशल यूपी मॉडेल आहे. त्यात वेगवेगळे बाहुबली असतात, नेत्यांच्या गुंड वाहिन्या असतात आणि अधूनमधून स्वतःच माफिया असल्यासारखे वागणारे पोलिसही असतात. खरं तर यामुळे रामू वर्माच्या फिल्मच्या शूटिंगला सेट लावावाच लागणार नाही. नुसतं रस्त्यावर कॅमेरा घेऊन फिरलं, तरी पुरेल! पण हे बाकीच्या सगळ्यांना पटेल तर ना. तुमची कंगना जिला शिव्या देते, त्या मुंबईत सर्वोत्तम आणि स्वस्त सार्वजनिक वाहतूक आहे, वीज आहे, सार्वजनिक आणि खाजगी आरोग्यसेवा आहे. रात्रबेरात्री मुलींनी फिरायची सोय आहे. हे सगळं सांगून तुम्हाला विचारावं, `तुम्हारे पास क्या है? तर तुम्ही म्हणणार, `मेरे पास गौमाता है!’ या उत्तराने मतं मिळतातच ना हो, फिल्म उद्योग कसा येईल?
आदरणीय योगी,
खरंतर माकड मांडीवर घेऊन कागदपत्रं सही करतानाचा तुमचा फोटो पाहिल्यापासून मी तुमचा `फ्यान’ आहे. गाईला घास भरवताना तुमच्या (आणि गाईच्या!) चेहर्यावरचे भाव पाहून मला भारावून जायला होतं. या अश्या प्राण्यांच्या रमणीय विश्वातून बाहेर पडून तुम्ही उद्योगधंद्यांचा विचार करताय, याने मी थोडा खिन्नच झालो. त्यातही तुम्ही उत्तर प्रदेशात फिल्म उद्योग उभा करायचा ठरवलाय, हे ऐकून मला धक्काच बसला. हे म्हणजे सनी लिओनीने आपण फक्त राजश्री प्रॉडक्शनच्या (हम आपके हैं कोन – फेम!) चित्रपटात काम करणार, अशी घोषणा करावी तसं झालं. म्हणजे योगीजी, आपल्या या देशात कुठेही एक उद्योग निर्माण होत असेल, बहरणार असेल, त्यातून असंख्य रोजगार मिळणार असतील, तर आनंदच आहे. पण अहो लक्षात घ्या, आख्खा मेरूपर्वत एका दमात उचलायचं हनुमंताला जमलं, कारण ते वानराच्या अवतारातले परमेश्वर होते. एक जितीजागती, अनेक दशकात बहरलेली इंडस्ट्री आपण एका दमात उचलू पाहत असू, तर आपण काय ठराल? आणि तुमचा (आणि तुमच्या माकडाचा, गोमातेचा आणि वाहिनी वगैरे गोरखपुरात टगेगिरी करत फिरणार्या तुमच्या कार्यकर्त्यांचा!) फ्यान म्हणून हे मला आवडणार नाही…
आता तुम्ही म्हणाल की तुमच्या हसीन स्वप्नाची अशी चेष्टा का बरं करावी? शेवटी कुठून तरी सुरुवात तर व्हायला हवी, हे खरं आहे साहेब, पण ही सुरुवात करताना फिल्म उद्योग कशाच्या जीवावर उभा राहतो, त्याचा विचार तर करा. या उद्योगाला सर्वात पहिली गरज असते, ती भांडवलाची. त्यात हा जोखमीचा उद्योग आहे. तेव्हा इतर व्यवसायात भरपूर कमावून जास्तीचे पैसे जोखमीने लावायची तयारी असणारे भांडवलदार या व्यवसायाला लागतात. कापड उद्योगाचं केंद्र असलेली मुंबई जसजशी देशाची आर्थिक राजधानी व्हायला लागली, तसतसं इथे ज्यादा निधी उपलब्ध झाला. तुमच्या संपन्न कर्मभूमीत परिस्थिती काय आहे? तुमचे परमेश्वर, म्हणजे मोदीजी, यांच्या नोटबदल, जीएसटी, किमान कॉर्पोरेट कर, अश्या एकाहून एक अमोघ अस्त्रांनी भांडवलदार सध्या घायाळ आहेत. पुन्हा मुळात उत्तर प्रदेशात स्वतःचे असे भांडवलदार अतिशय कमी, आहेत ते मुख्यत्त्वे शेती प्रक्रिया (साखर कारखानदार) किंवा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातले. सध्या भीषण मंदीतून जाणारे. आत्ता तुमच्या या बोल्ड आणि ब्युटीफुल स्वप्नावर पैसा लावणार कोण? बाकी सगळी सोंगं जमतात प्रिय कफनी-धारीजी, पण पैश्याचं सोंग कुठून आणाल???
दुसरी गरज असते, पायाभूत सुविधांची. चार मोठ्ठी विमान उतरवता येतील असे हायवे बांधले, तर स्टंटचं शूटिंग होऊ शकेल. तोच आपला पायाभूत विकास म्हणून तुम्ही मिरवताय. अहो, आख्खा उद्योग उभा करायचा तर इतर अनेक सुविधा लागतात. उदा आरोग्य सेवा. आपलं हे डिपार्टमेंट आहे का? आपण कसं, ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून आपल्याकडे लहान मुलं दगावली तर ही तक्रार करणार्या डॉक्टरलाच `उचलतो!’ पुन्हा तो यवन असल्याने पापी असतोच. पण हे सगळं मुंबईत वाढलेल्या कलाकारांना कसं हो कळणार! त्यांचे भलतेच लाड असतात तिथे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्यवसाय तिथे आणायचा, तर शहरी विकास लागेल. आपल्या अनेक शहरात अजून पाणी आणि विजेची बोंब आहे. आणि कायदा आणि सुव्यवस्थेचं आपलं एक पेशल यूपी मॉडेल आहे. त्यात वेगवेगळे बाहुबली असतात, नेत्यांच्या गुंड वाहिन्या असतात आणि अधूनमधून स्वतःच माफिया असल्यासारखे वागणारे पोलिसही असतात. खरंतर यामुळे रामू वर्माच्या फिल्मच्या शूटिंगला सेट लावावाच लागणार नाही. नुसतं रस्त्यावर कॅमेरा घेऊन फिरलं, तरी पुरेल! पण हे बाकीच्या सगळ्यांना पटेल तर ना!
तुमची कंगना जिला शिव्या देते, त्या मुंबईत सर्वोत्तम आणि स्वस्त सार्वजनिक वाहतूक आहे, वीज आहे, सार्वजनिक आणि खासगी आरोग्यसेवा आहे. रात्रबेरात्री मुलींनी फिरायची सोय आहे. हे सगळं सांगून तुम्हाला विचारावं, `तुम्हारे पास क्या है? तर तुम्ही म्हणणार, `मेरे पास गौमाता है!’ या उत्तराने मतं मिळतातच ना हो, फिल्म उद्योग कसा येईल?
आणि मी सगळ्यात मोठी अडचण सांगतो. काय आहे, या उद्योगाला लागतं मजबूत मनुष्यबळ. `योगीजी, तुम्ही माकड उजव्या मांडीवर घेणार का डाव्या’, असे लडिवाळ प्रश्न विचारणारा अक्षयकुमार एकटा फिल्म बनवत नाही. त्यात दिग्दर्शक ते स्पॉट बॉय, अशी शेकडो माणसं लागतात. ज्या भौगोलिक प्रदेशात तुम्ही या व्यवसाय नेऊ पाहताय, तिथे ती असावी लागतात. आणि ही सगळी माणसं निर्माण होतील, असं शैक्षणिक–सांस्कृतिक वातावरण लागतं. त्या वातावरणात उदारमतवाद, खुलेपणा, काहीशी बंडखोरी, मुक्त विचारमंथन लागतं. आमच्याकडे तुमच्याहून कट्टर हिंदुत्त्ववादी असणार्या बाळासाहेबांचीही युसूफ खान उर्फ दिलीपकुमारशी दोस्ती होती. इथल्या एका टोकाला सिद्धिविनायक आणि दुसर्या टोकाला लेनिनग्राड चौक आहे. बाकी सगळं जमेल, पण हे खुल्या विचारांचं वातावरण तुम्ही कसं आणणार? तुमचा अर्धा वेळ जातो कोण कोणाशी लग्न करतंय, त्याच्या बेडरुमात डोकावण्यात. इथे फिल्मवाल्यांच्यात बिनधास्त जात/धर्म/गोत्र न पाहता लग्न करतात. (आणि कधीकधी पुरुष-पुरुष/स्त्री -स्त्री पण करतात…!) म्हणजे हादरलाच की धर्म? लव्ह जिहाद तर ठायीठायी खच्चून भरलाय, पण प्रेम-युद्ध पण आहे (म्हणजे ऋतिक-सुझान, सोहा-कुणाल वगैरे)आता या सगळ्यांना तुरुंगात टाका नाहीतर एन्काउंटरमध्ये उडवा, हे किती कटकटीचं काम आहे, नाही का? त्यात तुमचा उरलेला अर्धा वेळ जातो कोण काय खातंय, ते स्वयंपाकघरात पाहण्यात. ही लोकं तर त्याची चेष्टा करतात. आणि योगीजी, कोणत्याही सनातन धर्माला चेष्टा चालते का? मग वेगवेगळं सेन्सॉर आणा. पुन्हा रोजच्या रोज भावना दुखावून घ्यायला रेडी असणारी रिकामटेकडी बेरोजगार पोरं आणा (ती तशी भरपूर आहेत म्हणा आपल्याकडे!).
कित्ती तो व्याप? त्यात ही फिल्मी पोरं पोरी वाट्टेल तसे कपडे घालतात, खातात (आणि पितात!), मनमौजी जगतात. या सर्वांवर गोरखनाथच्या मठाचे संस्कार करायचे म्हणजे कित्ती जटील काम? त्यापेक्षा जाऊ द्या नं मठाधिपती, नाही सौदी अरेबियात `समृद्ध’ फिल्म इंडस्ट्री, नाही व्हॅटिकनची `प्रगल्भ’ नाट्यचळवळ, तशी नैतिक दांडुक्यावर राजकारण चालवणार्या तुमच्या प्रदेशात नसेल फिल्म कला आणि कलाकार, तर बिघडलं कुठे? शेवटी गौमाता सलामत, तो धंदे पच्चास!
म्हणून म्हणतो, ही मुंगेरीलालची भेसूर स्वप्नं सोडा. कंगनाचा गायीसोबत, अक्षयचा बैलासोबत आणि विवेक अग्निहोत्रीचा माकडासोबत फोटो काढून घ्या आणि ट्विट करा, लै लाईक्स मिळतील!
आपला,
मर्कटप्रेमी!