‘कांदा सेक्सी आहे काय?’ या विषयावरील परिसंवाद या वर्षी गंगाराम सीताराम चाळीतील दगडूशेठ व्याख्यानमालेत चांगलाच गाजला. दरवर्षी दिवाळीनंतर फराळाची सुस्ती उडवण्यासाठी गंगाराम सीताराम चाळीत हॉट म्हणजे ज्वलंत विषयांवरील व्याख्यानमाला चाळीच्या पटांगणात भरविण्यात येते. आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक तज्ज्ञ या व्याख्यानमालेत भाषणे ठोकून गेले आहेत. यंदा कोरोनाच्या साथीमुळे जाहीर कार्यक्रमांवर बंदी असल्यामुळे चाळीच्या गच्चीवरच फक्त चाळकर्यांसाठीच या गुप्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. गच्ची मोठी असल्यामुळे श्रोत्यांमध्ये तीन-तीन फुटाचे अंतर ठेवून जमिनीवरच खडूने वर्तुळे आखून बसण्याची व्यवस्था केली होती. मुळात ‘कांदा सेक्सी आहे काय?’ हा विषय परिसंवादासाठी सुचला तरी कसा, हा प्रश्न अनेकांना पडला होता.
परिसंवादाचे प्रास्ताविक करताना चाळ कमिटीचे सेक्रेटरी गुंडाप्पा लुकतुके यांनी नेहमीप्रमाणे डोळे मिचकावत त्याविषयीचे सुतोवाच केले. ते म्हणाले, कांद्याला आम्ही नव्हे तर तुमच्या लाडक्या ‘फेसबुक’ने ‘सेक्सी’ ठरवलं आहे. त्यांच्या दृष्टीने कांदा सेक्सी असून तो मनुष्यप्राण्याच्या नको त्या वासना चाळवतो. फेसबुकवरील एका जाहिरातीत आपली अक्कल पाजळताना त्यांनी म्हटले होते की, कांद्याचे दोन प्रकार आहेत. एक सामान्य कांदा व दुसरा सेक्सी कांदा. ते पाहून कॅनडाच्या एका व्यापार्याला त्या कळलाव्या अकलेच्या कांद्यांची कीव आली आणि त्याने फेसबुकवाल्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यांनी दर्शकांची क्षमा मागून ती जाहिरात मागे घेतानासुद्धा कांद्याची ही जाहिरात लैंगिक भावना वाढविणारी व सेक्सी आहे, असे म्हणून ती जाहिरात काढून टाकली. मीही फेकाफेक करीत नाही तर खरोखरच ही बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली आहे. वाटल्यास मी तुम्हाला वृत्तपत्रातील ही बातमीच वाचून दाखवतो. कॅनडामध्ये पूर्वेकडील राज्य न्यू फाऊंडलँडमधील सेंट जोन्स शहरातील एका कंपनीने फेसबुकवर कांद्याची जाहिरात दिली. परंतु फेसबुकने कांद्याची ही जाहिरात लैंगिक भावना वाढविणारी व सेक्सी आहे असे म्हणून ती काढून टाकली. या जाहिरातीचे शीर्षक- ओनियन : वल्ला वल्ला स्वीट (सीड) असे होते. पण नंतर कॅनडामधील फेसबुकच्या प्रवक्त्याने असा खुलासा केला की, ऑटोमेटेड टेक्नॉलॉजीमुळे ही चूक झाली. त्याबद्दल कांदा उत्पादक शेतकर्यांची आणि संबंधित कंपनीची माफी मागत आहोत. हा माफीनामा झाल्यानंतर त्या कंपनीने हीच जाहिरात पुन्हा फेसबुकवर टाकली.
आता बोला! त्यामुळे मला आणि आमचे चाळ कमिटींचे अध्यक्ष बाळूमामा टकले यांना प्रश्न पडला की, कांदा खरोखरच सेक्सी आहे काय? आपण यंदाच्या व्याख्यानमालेत त्या विषयावर एक परिसंवादच आयोजित करावा असे कमिटीत ठरले व बाहेरचे कोणी तज्ज्ञ आणण्यापेक्षा चाळीतील रहिवाशांनीच या परिसंवादात मते मांडावी. फक्त विभागातील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध कांदा व्यापारी किसनजी चोरमारे यांना परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून बोलवावे. त्याप्रमाणे ते आले आहेत आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे आपल्या चाळीतील रहिवाशांना उद्यापासून एक किलो कांद्यामागे पाच रुपये सूट ते देणार आहेत. त्यामुळे कांदा सेक्सी असला काय आणि नसला काय, आपला फायदाच होणार आहे. आता परिसंवादासाठी ज्या पाच चाळकर्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी एकेकाला मी येथे आपले विचार मांडण्यासाठी आमंत्रित करतो. प्रथम आपल्या चाळीतील सिनेशौकीन एस. दर्याकुमार टेलर.
–
मी थेट विषयालाच हात घालतो. कांदा सेक्सी आहे किंवा नाही हा वादच मुळात चुकीचा आहे. सूर्य प्रकाश देतो हे सिद्ध करण्याची जशी आवश्यकता भासत नाही, तसेच कांदा सेक्सी आहे हे सांगण्याचीही गरज नाही. कोणती नटी सेक्सी आहे हे सांगण्याची जशी गरज नसते तसेच कांद्याचेही आहे. कांदा ही एक अनुभवण्याची गोष्ट आहे. आपल्याच नव्हे तर ब्राझिल, इराणसहित अनेक देशांत आहारात कांद्याचा समावेश केला जातो तो त्यामुळेच. आपले दादा कोंडके यांच्या एका चित्रपटातील कांदे नवमीचा तो प्रसंग आठवा. खास कांद्याची पॉवर दाखवण्यासाठीच दादांनी त्या प्रसंगाचा समावेश चित्रपटात केला होता. आज ते असते तर त्यांनीच त्या प्रश्नाचे शृंगारिक विनोदी उत्तर देऊन सर्वांना पोट धरून हसवले असते. मला तर लहानपणापासून कांदा-भाकर खाण्याची आवड आहे. सफेद कांदा औषधी आहे, पण गुलाबी कांदा रोज रात्री जेवणाबरोबर खाल्ल्यास ‘गुलाबी रात की हर बात गुलाबी’ होते हे लक्षात असू द्या. या विषयावर ‘सेक्सी ओनियन’ किंवा ‘ओनियन सेक्स’ या नावाचा चित्रपट काढण्याचा माझा विचार आहे. आपल्या चाळीतील हौशी रहिवाशांना त्यांची ओनियन टेस्ट घेतल्यावर त्यात चान्स मिळेल. निर्माते म्हणून आजच्या परिसंवादाचे अध्यक्ष प्रसिद्ध कांदा व्यापारी किसनजी चोरमारे यांचे नाव मी जाहीर करतो.
त्यानंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि श्रोत्यांमधील तरुण-तरुणी, आबालवृद्धांच्या चेहर्यावर गुलाबी कांद्यासारखी चमक पसरली. त्यानंतर चाळीतील रेकॉर्डब्रेक आठ अपत्यांचे बाप असलेले झांगोजी खरकटे यांना भाषणासाठी पाचारण करण्यात आले.
–
आज मला हा जो भाषण करण्याचा मान दिलाव त्याबद्दल मी कमिटीचा आभारी हाव. आमी तुमाला सांगताव की आमच्या वाडवडलांपासून भरपूर कांदे खान्याची परंपरा आमच्या घरान्यात चालत आलेली हाव आणि त्येची किती फला आमाला मिळाली ती तुमी बगतावच हाव. आमच्या खापर पनजोबापासून गावात आमी कांद्याची लागवड केलाव. तिचा वंशविस्तार आणि आमच्या घराण्याचा वंशविस्तार नेटाने चालू हाय तो कांदे खान्यामुलेच हा मी छातीवर हात ठोकून सांगतो. कांदा सेक्सी हाय की नाय यातला आमाला काय कलत नाय. आमी नाकाने कांदे सोलत नाय, पन एकावेली पाच-पाच कांदे खातो. त्यातून शक्ती येते. तुमी तिला ऊर्जा का काय म्हनताव. जो खातो कांदा, त्याचा कधीच होत नाय वांदा… हे लक्षात ठेवा. जय कांदा! जय जय कांदा!! येताव. नमस्ते…
त्यानंतर चाळीतील गप्पांच्या अड्ड्यावर सर्वज्ञाच्या थाटात सर्व विषयांवर ठामपणे आपली मते मांडणारे गजाभाऊ मानकामे भाषणासाठी उभे राहिले.
–
आपल्या चाळीतील सर्व बंधूंनो, शेजार्यांनो आणि शेजारणींनो, आजच्या परिसंवादाचा विषय थोडा नाजूक आहे. तरीही मला माझी मते ठामपणे मांडलीच पाहिजेत. मी स्वत: कांदाप्रेमी आहे. परंतु कांद्याकडे मी त्या दृष्टीने कधीही पाहिले नाही. आपल्या अन्नपदार्थांत कांदा लागतो, पण त्याचा संबंध गृहिणींशी जास्त येतो. कांदा चिरताना त्यांच्या डोळ्यात येणारे पाणी मला कधीच पाहवत नाही. आमच्या घरी मी माझ्या सौभाग्यवतीला कधीच कांदा चिरू देत नाही, तर मी स्वत: एका बुक्कीत तो फोडतो. त्याच्या चिंधड्या झाल्यावर मी त्या तिच्या नाजुक हातात देतो. मग ती फोडणी का काय म्हणतात ती देते. जेव्हा या परिसंवादासाठी मला आमंत्रण देण्यात आले तेव्हा मी कांदा या विषयावरील सर्व साहित्य लायब्ररीत जाऊन वाचले. आपले प्राचीन ग्रंथ चाळले. त्यात कांद्याच्या पॉवरविषयी ऋषी मुनींनी त्यावेळीच लिहून ठेवले आहे. फेसबुकने त्यापेक्षा नवीन काहीही सांगितलेले नाही. मला कांद्याचा चांगला अनुभव आला आहे, एवढेच मी सांगेन. या निमित्ताने कांद्याची महती जगाला नव्याने कळली यासाठी आपण फेसबुकला धन्यवाद दिले पाहिजेत. यापुढे लग्नसमारंभात वधुवरांना पैशाच्या किंवा भेटवस्तूंच्या आहेरापेक्षा कांद्याची चार किंवा पाच डझनाची पेटी आहेर म्हणून दिली तर त्याचा योग्य उपयोग त्यांना होईल. धन्यवाद…!!
त्यानंतर चाळ कमिटीच्या महिला विभागाच्या अध्यक्षा सौ. सुकन्या ढमाले बोलण्यासाठी उभ्या राहिल्या.
–
आजच्या असल्या उथळ विषयात मला रस नाही. एकीकडे कांद्याचे भाव अवाच्या सवा वाढत असताना त्यासाठी आपल्या चाळीतर्फे आंदोलनासारखे कार्यक्रम हाती घेण्याऐवजी अशा थिल्लर विषयावरती टाइमपास करणे मला मान्य नाही. त्याने आपल्या जीवनात फरक पडणार नाही. पुरुषांनी हवे तेवढे कांदे खावे, काय वाटेल ते करावे, मात्र महिलांसमोर अशा विषयावर चर्चा करू नये. प्रत्येकाच्या खासगी जीवनातील हा प्रश्न आहे. तो चव्हाट्यावर आणून आपल्या चाळीचा लौकीक धुळीस मिळवू नये. उद्यापासून मी घरात स्वयंपाकात कांदा वापरणार नाही आणि घरातही येऊ देणार नाही. मिस्टर बाहेरून कांदा खाऊन आले तर त्यांनाही घरात घेणार नाही. मला कांद्याचा वासही खपत नाही. मी स्वत: कांदा खाऊन अनीतीच्या मार्गाला लागलेल्या पुरुषांना आणि स्त्रियांना वठणीवर आणण्यासाठी राम गणेश गडकरींच्या ‘एकच प्याला’प्रमाणे ‘एकच कांदा’ नावाचे संगीत नाटक लिहिण्याचा संकल्प येथे सोडत आहे. आता मी कमिटीला राजीनामा दिल्याचे जाहीर करून सभात्याग करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गंगाराम सीताराम चाळ…!!
बाईंचा हा आवेश पाहून सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले. आयोजकही परिसंवाद आवरता घेण्यासाठी कुजबूज करू लागले. एवढ्यात चाळीने ओवाळून टाकलेला दारूबाज गंप्या धडपडत तोल सावरत माझ्यापाशी आला…
–
कोण म्हणतो कांदा वाईट आहे! आमी पिताना खायला काही नसले तर कांदा तोंडी लावतो. एकदम वेगळी टेस्ट येते. ज्या वेळी आमी कधी कधी पिऊन बेशुद्ध पडतो त्या वेळी आमच्या नाकाला लावून शुद्धीवर आणतो तो कांदा. कांदाभजी खाण्यात जी मजा आहे ती बटाटाभजीत नाही. आणखी कांद्याचे काय गुण सांगू…?
गंप्याचे लेक्चर चालू असतानाच चाळीतल्या मोरजकरांच्या मुलाने फटाक्याची माळ गुपचूप त्याच्या पायामागे लावली आणि तिच्या आवाजाच्या दणक्याने एकच पळापळ होऊन परिसंवादाची वासलात लागली.