राज्यात ई वेस्टमध्ये(ई कचरा) मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून ई वेस्टही जागतिक स्तरावर समस्या होत आहे. राज्यात मागील तीन वर्षांत तब्बल 29 हजार 480 मेट्रिक टन ई कचऱयावर पुनर्पक्रिया करण्यात आली, अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
राज्यातील ई कचऱयाच्या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केल होता. त्यावर लेखी उत्तरात सविस्तर माहिती दिली आहे. इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांशी संबंधित गोळा केलेल्या ई कचऱयाची डिसमॅनटलर्स व रिसायकलर्सद्वारे विल्हेवाट लावण्यात येते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 90 डिसमॅनटलर्स व 9 रिसायकलर्स अधिकृतपणे नियुक्त केले आहेत. त्यात कुशल कामगार असतात. पण ई कचऱयाच्या संकलन प्रक्रियेत असंघटित कामगार असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे लेखी उत्तरात नमूद केले आहे.
मागील तीन वर्षांतील ई कचऱयाची पुनर्प्रक्रिया व पुनर्वापर
वर्ष ई कचरा (मेट्रिक टनमध्ये)
2017- 2018 7 हजार 159.581
2018-19 9 हजार 139.036
2019-20 13 हजार 141. 93
सौजन्य : दैनिक सामना