राज्यातील कोरोनाचे बळी, वाढीव वीज बील, मेट्रो कार शेड, मराठा आरक्षण , दोन दिवसांचा अधिवेशनाचा काळ अशा विविध मुद्यांवर महाविकास आघाडीवर टीका करीत विरोधकांनी सत्ताधारी पक्षाच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्णब गोस्वामी आणि कंगनाच्या सगळ्या विचारांशी आम्ही सहमत नसल्याची स्पष्ट शब्दांत कबुली दिली.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.
जनतेचे प्रश्न कसे मांडणार?
या सरकारला अधिवेशन हिवाळी अधिवेशन एक किंवा दोन आठवडे घेणे निश्चितपणे शक्य होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस झाला. त्यावेळी मेळावे झाले ना? आम्हीही मेळावे घेतो आहोत. जर हे सगळे होऊ शकते तर अधिवेशन दोन दिवसांचे का घेतले जाते, या अधिवेशनात सात तासांचेच कामकाज होईल असा दावा करीत आम्ही जनतेचे प्रश्न कसे काय मांडायचे? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
राज्यात अघोषित आणीबाणी
राज्यात सध्या अघोषित आणीबाणीचे वातावरण असून, सरकारच्या विरोधात जो बोलेल त्याला तुरुंगात टाकले जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सौजन्य- सामना