उत्तर हिंदुस्थान थंडीच्या लाटेमुळे गारठला आहे. राजधानी नवी दिल्लीत घसरलेला पारा आणि दाट धुक्यांमुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दृश्यमानता कमी झाल्याने वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. राजधानी दिल्लीतील अनेक भागात तापमान 5 अंशांच्या खाली गेले आहे. तर जम्मू कश्मीरच्या श्रीनगरमध्ये थंडीने गेल्या 25 वर्षातील विक्रम मोडला आहे.
दिल्लीजवळील पालममध्ये सकाळी 6.2 अंश तापमानाची नोंद झाली. तर सफदरजंगमध्ये 2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पहिल्यांदाच राजधानी दिल्लीत जानेवारी महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. 1 जानेवारीला तापमान 1.1 अंश सेल्यिअसपर्यंत खाली आले होते. या आठवड्यात तापमानाचा पारा असाच घसरत राहील तसेच दाट धुकेही कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जम्मू कश्मीरमध्येही थंडीची लाट कायम असून थंडीने गेल्या अनेक वर्षातील विक्रम मोडले आहेत. पहेलगाममध्ये पारा उणे 12 अंशापर्यंत घसरला आहे. तर गुलमर्गमध्येही उणे 10 अंश तापमानाची नोंद झाली आहे. श्रीनगरमध्ये 25 वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. थंडीने श्रीनगरमधील 25 वर्षांचा विक्रम मोडला आहे. गुरुवारी श्रीनगरमध्ये उणे 8.4 तापमानाची नोंद झाली आहे. तर बुधवारी श्रीनगरमध्ये उणे 7.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान 9 वर्षातील सर्वात नीचांकी आहे.
थंडीच्या 25 वर्षातील विक्रमाने दाल सरोवर पूर्णपणे गोठले आहे. दाट धुक्यांमुळे हवाई वाहतुकीसही अडचण येत आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी प्रशासनाला रस्त्यावरील बर्फ हटवून बाधित नागरिकांना मदत पोहचवण्याचे निर्देश दिले आहेत. डोंगराळ भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागातही तापमानात मोठी घट झाली आहे. दिल्लीतील पालममध्ये पारा 3.2 अंशापर्यंत पडला आहे. तर चंदीगडमध्ये पारा 12.2 अंशापर्यंत खाली आला आहे.
राजस्थानातील फतेहपूरशेखावटीमध्ये तापमान उणे शून्य अंशांच्या खाली गेले आहे. पश्चिम हिमालयाकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मौदानी भागातील तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आठवडाभर उत्तर हिंदुस्थानातील नागरिकांना थंडी आणि दाट धुक्यांचा सामना करावा लागणार आहे.