गेले तब्बल 9 महीने बंद असलेले मुंबईतले पहिले नाट्यगृह म्हणून प्रसिद्ध असलेले परळचे दामोदर नाट्यगृह लवकरच म्हणजे ऐन नाताळ सुट्टीत शुक्रवार 25 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होतंय. या दिवशी सायंकाळी 4 वाजता ‘लाँग लाईफ’ हे धमाल विनोदी नाटक रंगणार आहे. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती प्रकाश ना. माचकर यांनी केली आहे. 23 सप्टेंबरला मुंबईत तुफान पाऊस पडला आणि दामोदर हॉलमध्ये पाणी भरले. खूप नुकसान झाले होते. तरीही दामोदर हॉलचे संचालक मंडळ आणि दामोदर हॉलची पूर्ण आजी-माजी व्यवस्थापक टीम यांनी ताबडतोब युद्ध पातळीवर काम करून नाट्यगृह छान तयार केले आणि सरकारच्या आदेशाची वाट पाहत बसले. यानंतर 5 नोव्हेंबर रोजी ‘रंगभूमी दिनी आजपासून नाट्यगृह सुरू’ ही बातमी समजली. तरीही सगळे निर्माते शांत राहिले. मुंबई सोडून बाहेरची नाट्यगृहे सुरू झाली आहेत. पण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असूनही येथे नाट्यगृहे सुरू झाली नव्हती. पण दामोदर नाट्यगृह सुरू व्हावे यासाठी बुकिंग क्लार्क आणि व्यवस्थापक सचिव हरी पाटणकर यांनी आजी माजी व्यवस्थापक बाबू राणे, पाटील साहेब आणि दामोदर नाट्यगृहाच्या दि सोशल सर्व्हिस लिगचे संचालक अध्यक्ष आनंद माईणकर, उपाध्यक्ष विजय वर्टी आणि सचिव चंद्रकांत खोपडे यांच्याशी चर्चा करून हे नाट्यगृह शुक्रवार 25 डिसेंबर या दिवसापासून नाट्यगृह सुरू करण्याचे ठरविले आहे.