मंगळवारी सूर्याचे पहिले किरण पडले तेच कोरोना मुक्तीच्या दिशेने… ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात पहाटे साडेपाच वाजता पुण्यातील सिरम इन्स्टीटय़ुटच्या कोविशिल्ड लसीचे कंटेनर्स-व्हॅन लोहगाव विमानतळावर पोहचले. झेड प्लस सुरक्षेत 9 विशेष विमानांद्वारे 478 बॉक्स आणि लसीचे 56 लाख डोस 13 शहरांमध्ये पोहचविण्यात आले. शनिवारपासून देशभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. कोरोनाची संक्रांत जाऊ दे, इडापिडा टळू दे, लसीकरण यशस्वी होऊ दे अशी प्रार्थना देशभरातून होत आहे.
केंद्र सरकारने सोमवारी ‘कोविशिल्ड’चे 1 कोटी 10 लाख डोस खरेदी करण्याची ऑर्डर दिली आणि रात्रीपासूनच मांजरीच्या सिरम इन्स्टीटय़ुटमध्ये लगबग पाहायला मिळाली. कोविशिल्ड लसीचे बॉक्स खास कोल्ड स्टोरेज व्हॅन-कंटेनर्समध्ये ठेवण्यात आले. ‘सिरम’चे सीईओ अदर पुनावाला हे आपल्या स्टाफबरोबर हजर होते. पहाटे साडेचार वाजता पहिल्या कंटेनरचे पुजन करण्यात आले. त्यावेळी सीरमच्या कर्मचाऱ्यांनी गणपती बाप्पा मोरयाचा गजर केला, पेढे वाटले. एकापाठोपाठ हे कंटेनर्स कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत लोहगाव विमानतळावर आले. पहाटे साडेपाच वाजता नऊ विशेष विमानांमध्ये लसीचे 478 बॉक्स ठेवण्यात आले. त्यात 56 लाख डोस आहेत.
दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, लखनौ, कर्नाल, गुवाहाटी, विजयवाडा, भुवनेश्वर, चंदीगड आणि पाटणा या शहरांमध्ये ‘कोविशिल्ड’ची लस पोहचली आहे. तेथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
2 ते 8 अंश तापमान
कोविशिल्ड लसीचे बॉक्स पुण्यातील लोहगाव विमानतळावर पोहचविण्यासाठी ‘सिरम’ने तीन विशेष कोल्ड चेन व्हॅनची व्यवस्था केली होती. ही लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात ठेवणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे व्हॅनमध्ये 3 अंशपर्यंत तापमान नियंत्रित करण्यात आले होते.
पहाटे साडेचार वाजता ‘कोविशिल्ड’च्या पहिल्या कंटेनरचे पुजन करण्यात आले. त्यावेळी सिरमच्या कर्मचाऱ्यांनी गणपती बाप्पा मोरयाचा गजर केला, पेढे वाटले. एकापाठोपाठ हे कंटेनर्स कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत लोहगाव विमानतळावर आले.
सौजन्य : दैनिक सामना