मुंबईत दिवाळीनंतर वाढणारी रुग्णसंख्या पुन्हा एकदा घटण्यास सुरुवात झाली असून सुमारे तेरा हजार सक्रिय रुग्णांपैकी फक्त तीन हजार रुग्णांमध्येच कोरोनाची लक्षणे आहेत. तर 9 हजार रुग्णांमध्ये पॉझिटिव्ह असूनही कोणतीही लक्षणे नाहीत. विशेष म्हणजे लक्षणे असलेल्या 3 हजार रुग्णांची प्रपृती लक्षणे असूनही ठणठणीत असून सुमारे 792 अत्यवस्थ रुग्णांमध्ये आवश्यक उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी केल्या जाणाऱया प्रयत्नांमुळे मुंबईत कोरोना चांगलाच नियंत्रणात आला होता. 16 नोव्हेंबर रोजी तर केवळ 409 कोरोना रुग्ण नोंदवले गेले. मात्र यानंतर रुग्णंख्या वाढत जाऊन सुमारे अकराशे ते बाराशेपर्यंत नोंदवली जाऊ लागली. दिवाळीच्या कालावधीत घटलेल्या चाचण्या, दिवाळीत वाढलेल्या गाठीभेटी आणि त्यानंतर दैनंदिन पाच हजार चाचण्यांची संख्या थेट 19 हजारांपर्यंत गेल्याने मुंबई रुग्ण जास्त नोंदवले जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र 19 हजारांपर्यंत चाचण्या करूनही पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आता एक हजारांच्या खाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घट आगामी काळात कायम राहून कोरोना लवकरच नियंत्रणात येईल असा दावाही पालिका प्रशासनाकडून करण्यात आला.
एकूण चाचण्या 18 लाखांवर
मुंबईत दैनंदिन कोरोना चाचण्यांची संख्या पाच हजारांवरून सद्यस्थितीत 19 हजारांवर गेली आहे. यामध्ये आतापर्यंत मुंबईत आतापर्यंत 18 लाख 85 हजार 717 कोरोना चाचण्या पालिकेच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. कोरोना पूर्णपणे रोखण्यासाठी आगामी काळात चाचण्यांची संख्या वाढवून मोठय़ा संख्येने रुग्ण शोधून आवश्यक कार्यवाही करण्याची धोरण असल्याची माहितीही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
2 लाख 55 हजार कोरोनामुक्त
पालिकेच्या माध्यमातून मुंबईतील कोरोना सद्यस्थितीची आकडेवारी डॅशबोर्डवर जाहीर केले जाते. यानुसार 28 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार मुंबईत एकूण रुग्णसंख्या 281874 झाली आहे. मात्र यातील 2 लाख 55 हजार 345 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर कोरोना पॉझिटिव्ह असूनही 8933 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. 3028 रुग्णांमध्ये लक्षणे असली तरी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर म्हणजेच उत्तम आहे. 792 रुग्ण क्रिटिकल असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे मुंबईत 10773 जणांचा मृत्यू झाला आहे.
धारावीत 20 ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबईतील कोरोनाच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील भाग असलेल्या धारावीत आज 9 कोरोना रुग्ण सापडल्यामुळे एकूण ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे. धारावीत आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 692 वर पोहोचली आहे तर 3 हजार 361 जण कोरोनामुक्त झाले आहेत. धारावीत पहिला कोरोना रुग्ण 1 एप्रिलला सापडला होता. मात्र, पालिकेच्या ‘मिशन धारावी’, आरोग्य शिबिरे, चाचण्यांमुळे कोरोना नियंत्रणात आला असून गेल्या काही महिन्यांपासून धारावीत 10च्या आत रुग्ण सापडत आहेत.