1 फेब्रुवारीपासून लोकलची दारे सर्वसामान्यांना खुली करण्यात आल्यानंतर लोकलच्या प्रवाशांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. सध्या मध्य रेल्वेवर दररोज 20 ते 22 लाख तर पश्चिम रेल्वेवर 17 ते 18 लाख प्रवासी असे मिळून एकूण रोज 37 ते 40 लाख मुंबईकर लोकलचा प्रवास करीत आहेत. कोरोनामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्यासाठी सुरूवातीला प्रत्येक लोकलमध्ये 700 प्रवाशांचे बंधन राखण्यात आले होते. मात्र, आता हे बंधन पाळले जात नसल्याने कोरोना वाढल्याचे म्हटले जात आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून लोकलसह रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर 15 जूनपासून अत्यावश्यक कर्मचाऱयांसाठी उपनगरीय लोकलच्या फेर्या मर्यादित प्रमाणात सुरू करण्यात आल्या. त्यावेळी कोरोनामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्यासाठी प्रत्येक लोकलमागे केवळ 700 प्रवाशांची परवानगी देण्यात आली होती. राज्य सरकारची तसेच केंद्र सरकारची अत्यावश्यक कर्मचार्यांची पालिकेने जारी केलेली आकडेवारी पाहून मध्य आणि पश्चिम रेल्वेने रोजच्या फेऱयांचे नियोजन केले होते.
1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना लोकलची दारे खुली करण्यात आली आहेत. कमी गर्दीच्या वेळेत सर्वसामान्यांना प्रवासाची मूभा देण्यात आली आहे. मात्र, यामुळे उपनगरीय मार्गावरील महत्त्वाची स्थानके प्रवाशांच्या गर्दीने ओसंडू लागली आहेत.
विनामास्क प्रवाशांकडून 12 लाखांचा दंड
1 फेब्रुवारीपासून लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. 1 ते 23 फेब्रुवारीमध्ये मध्य रेल्वेवर विनामास्क प्रवाशांविरोधात 3,616 केसेस दाखल होऊन 8 लाख 69 हजार 800 रूपयांचा दंड वसुल केला आहे. तर पश्चिम रेल्वेवर 2,526 केसेस दाखल होऊन 3 लाख 69 हजार 800 रूपयांचा दंड असे मिळून एकूण 12 लाख 30 हजार 100 रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
- लॉकडाऊनपूर्वी मध्य रेल्वेवर दररोज 1774 तर पश्चिम रेल्वेवर 1376 फेर्या चालविण्यात येऊन 75 लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करीत होते. सध्या मध्य रेल्वेवर रोज 1686 तर पश्चिम रेल्वेवर 1300 लोकल फेऱया चालविण्यात येत आहेत.
- मध्य रेल्वेवर दररोज सरासरी 20 लाख तर पश्चिम रेल्वेवर 17 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रवासाची मंजूरी दिलेल्या नॉक पिकअवरमधील गर्दी प्रचंड वाढून कोरोनासाठीचे सामाजिक अंतर राखणे कठीण जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सौजन्य : दैनिक सामना