राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गोसे खुर्द प्रकल्पाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी गोसे खुर्द प्रकल्प पूर्ण करतानाच या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावे असे निर्देश दिले. बाधितांचे पुनर्वसन पूर्ण झाल्यावर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. गोसेखुर्द प्रकल्प यापुढे न रखडता सर्व घटकांच्या सहकार्याने डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाला पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.
गोसे खुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे नियोजन करावे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करून विदर्भातील जनतेस सिंचनासाठी मोठा लाभ मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोसीखुर्द प्रकल्पाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. या बैठकीत गोसे खुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचनक्षमता याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी या जाणून घेतली.
मुख्यमंत्री म्हणाले की विकासाची कामे करताना पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे नाग नदीमुळे प्रदूषण होणार नाही, यादृष्टीने नाग नदी प्रदूषणासंदर्भात दीर्घकालीन आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार गौतम विभागीय आयुक्त संजीवकुमार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, अधीक्षक अभियंता अंकूर देसाई तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.