कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसला. सरत्या वर्षांच्या अखेरीस या क्षेत्राला थोडाफार दिलासा मिळाला असला तरी नववर्ष चिंतेचे असणार असल्याचे भाकीत वर्तविले जात आहे. 2021 हे रिअल इस्टेटसाठी हा खऱया अर्थाने आव्हानात्मक असणार असल्याचे मत नेरडेको आणि असोचॅमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला 2020 मध्ये बराच फटका बसला. सणासुदीच्या काळात आणि वर्षाच्या अखेरीस खरेदीचा माहोल रंगला होता. परंतु 2021मध्ये हा रंग कायम राहील का याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. याबद्दल बोलताना नेरडको आणि असोचॅमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदनी सांगतात की, 1 जानेवारी 2021 पासून महाराष्ट्रात मुद्रांक शुल्कात 1 टक्क्याने वाढ होणार आहे.
घरांच्या किंमती खरेदीदारांच्या बजेटबाहेर जाऊन चालणार नाही. या सर्व बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असल्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली आहे. यासाठी राज्य सरकार मुद्रांक शुल्क कशा प्रकारे ठरवितात त्यावर खरेदीच्या आलेखाचे गणित ठरेल. तर मुख्य म्हणजे शुल्कात प्रकल्पाच्या किंमतीच्या 30 टक्के रक्कम गृहीत धरल्यास प्रकल्पाचा खर्च कमी होणार असल्याने या योजनेमुळे सर्वांना फायदा होईल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
ग्रीन रिअल इस्टेटला भविष्य
येत्या काळात ग्रीन रिअल इस्टेटला भविष्य असणार असून प्रकल्प पूर्ण करताना पाणी, कचऱयाचे पुनर्चक्रमण कशा प्रकारे करण्यात येते, पावसाचे पाणी साठवणे, कार्बन उत्सर्जनावर नियत्रंण कशा प्रकारे ठेवता येईल आणि अक्षय ऊर्जेची कशाप्रकारे निर्मिती करत आहात या सगळय़ा गोष्टींना प्राधान्य द्यावे लागणार असल्याचे हिरानंदानी यांनी यावेळी सांगितले.