आर्थिक मंदी आणि कोरोनामुळे मुंबई महापालिकेचा महसूल घटला आहे. त्याचा परिणाम मुंबईतील विकासकामांवर होऊ नये तसेच मुंबईकरांवर नव्या करांचा बोझा पडू नये, यासाठी महापालिका मुंबई शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. कर्ज रोखे विकून त्या माध्यमातून पैसे उभारण्याचा विचार पालिका करत आहे. गटनेत्यांच्या आगामी बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडला जाणार आहे
जागतिक आर्थिक मंदी आणि आता कोरोनामुळे पालिकेचा महसूल घटला आहे तर विविध उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत. बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी प्रीमियममध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली आहे तर मालमत्ता कराची अपेक्षित वसुली झाली नाही. सर्व प्रकारचे उत्पन्न मिळून 2020-21मध्ये पालिकेचे सुमारे दहा हजार कोटींचे नुकसान झाले आहे. पालिकेला रस्ते, पाणी, पूल, घनकचरा, मलनिःसारण यासह विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी दरवर्षी 10 ते 12 हजार कोटी रुपये लागतात.
जीएसटीचे वार्षिक सात ते आठ हजार कोटींचे उत्पन्न वगळता अन्य उत्पन्नांचा पर्याय सध्या पालिकेकडे नाही. बँकांमधील दीर्घ मुदतठेवी सुमारे एक लाख कोटींच्या घरात आहेत. मात्र त्यातील रुपये विविध विकास प्रकल्प, कर्मचार्यांचे पेन्शन व इतर कामांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुदतठेवी मोडता येत नाहीत. यामुळेच विकासकामांसाठी लागणारे हजारो कोटी रुपये शेअर बाजारातून उभे ‘ण्याचा विचार पालिका करत आहे.