बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात वादग्रस्त ठरलेले भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे आता उद्विग्न झाले आहेत. ‘का म्हणून मी राजकारणात पडलो? माझा मठ, माझं धार्मिक कार्य बरं होतं,’ असे म्हणत त्यांनी आपली उद्विग्नता जाहीर केली आहे.
सन 2019मध्ये बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे महास्वामींनी सोलापूर लोकसभेची निवडणूक लढविल्याचे हे प्रकरण आहे. याच प्रकरणात न्यायालयीन लढय़ादरम्यान त्यांची आता पोलीस चौकशी सुरू झाली आहे. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात काल खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे दोन तासांहून अधिक केळ कसून चौकशी झाली. पोलिसांच्या उलटसुलट प्रश्नांच्या सरबत्तीवर महास्वामी अक्षरश: रडकुंडीला आले. चौकशीदरम्यान महास्वामींना घाम फुटला. घशाला कोरड पडली. तथापि, त्यांनी काय जबाब दिला, हे अद्यापि गुलदस्त्यात आहे. यापुढेही त्यांची चौकशी होईल, असे सांगण्यात आले. त्यांच्या अटकेचीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सौजन्य : दैनिक सामना