बनावट चावीचा वापर करून मोटारसायकली चोरणाऱया टोळीच्या डी. एन. नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जुबेर अब्दुल रेहमान शेख ऊर्फ जुब्बा, अय्याज हारुण सय्यद आणि आकाश नवनाथ पवार अशी या तिघांची नावे आहेत. त्या तिघांकडून पोलिसांनी सहा मोटारसायकली आणि एक रिक्षा जप्त केली आहे.
गेल्या काही दिवसापासून पश्चिम उपनगरात वाहने चोरीचे प्रकार वाढले होते. या गुह्यातील आरोपी विरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ निरीक्षक परमेश्वर गणमे यांच्या पथकातील सहायक निरीक्षक विकास पाटील, अनिल मुळे, अश्विन कदम, सादिक मुजावर आदींनी तपास सुरु केला.
तपासा दरम्यान पोलिसांनी अंधेरी परिसरातील सीसीटीक्ही फुटेजची पाहणी केली. त्यावरून पोलिसांनी जुबेर आणि अय्याजला ताब्यात घेतले. तपास सुरु असतानाच पोलिसांनी आकाशला देखील ताब्यात घेतले. जुबेर आणि अय्याज हे जॉय राईड साठी मोटारसायकल चोरत होते. त्या दोघांनी चोरीच्या मोटारसायकली अंधेरी येथील पे अँड पार्प मध्ये लपून ठेवल्या होत्या. तर आकाशने बोरिवली येथे मोटारसायकल लपवल्या होत्या. त्या तिघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले.
सौजन्य : दैनिक सामना