बिहार सरकारने तृतीयपंथीयांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता बिहारमध्ये तृतीयपंथीयांनाही पोलीस दलात स्थान मिळणार असून त्यांच्यासाठी वेगळी तुकडी स्थापन करण्यात येणार आहे. या निर्णयाबाबत सरकारचा विचार सुरू असून त्याला मान्यता मिळाल्यास पोलीस दलात तृतीय पंथीयांची तुकडी असलेले बिहार हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. आतापर्यंत पोलीस दलात तृतीयपंथीयांच्या भरती प्रक्रियेबाबत निकष किंवा विशिष्ट धोरण नाही. त्याबाबत सरकार विचार करत असल्याचे सांगण्यात आले.
बिहारमध्ये सुमारे 40 हजार तृतीयपंथीय आहेत. सरकार पोलीस दलात तृतीयपंथीयांची भरती करून त्यांची वेगळी तुकडी स्थापन करण्याचा विचार करत असल्याचे गृह मंत्रालयाचे मुख्य सचिव अमीर सुभानी यांनी शुक्रवारी सांगितले. याबाबतची कोणतीही माहिती आता देणे अयोग्य होईल, असे सांगत त्यांनी अधिक तपशील देण्यास नकार दिला. राज्य सरकार याबाबत विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.