बेस्टमध्ये गेली 14 वर्षे रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेण्यासाठी बेस्ट कामगार सेनेने केलेल्या पाठपुराव्यांना यश आले आहे. एकूण 807 रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांपैकी पहिल्या 30 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामावर नियुक्ती करण्याची यादी 22 जानेवारी रोजी निघाली आहे. आता या महिन्यात पुढील 177 रोजंदारी कर्मचारी वर्गाची कायमस्वरूपी कामगार करण्याची यादी काढण्यात येणार आहे आणि अशीच सर्व उरलेल्या रोजंदारी कर्मचारी वर्गाची यादी बेस्ट प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशानुसार बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत, सरचिटणीस राजन चौधरी, कार्याध्यक्ष उदयपुमार आंबोनकर, सदस्य अनिल कोकीळ यांच्या पाठपुराव्यामुळे आणि बेस्ट प्रशासनाच्या सहकार्याने बेस्टमधील गेली 14 वर्षे एकूण 807 रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने बेस्टच्या कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. यापैकी प्रथम 30 रोजंदारी कर्मचारी वर्गाची कायमस्वरूपी कामगार म्हणून नियुक्ती करण्याची यादी 22 जानेवारी रोजी काढण्यात आली आहे. रोजंदारी कर्मचारी वर्गाने याबाबत अध्यक्ष सुहास सामंत, सरचिटणीस राजन चौधरी आदींचे आभार मानले आहेत.