जनसेवक मेळाव्यासाठी आज सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावात दाखल होत आहेत. या दौऱ्यात अमित शहा यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट धुडकावल्याने मराठी भाषिकांमधुन तीव्र नाराजी व्यक्त होत असून शहा दाखल होण्यापुर्वीच त्यांना बेळगावात कडाडून विरोध होत आहे. “अमित शहा गो बॅक” चा नारा देत शेतकऱ्यांनी सकाळी राणी चन्नम्मा चौकात चक्क अर्धनग्न अवस्थेत निदर्शने करुन शेतकरी कायद्यावरुन निषेध नोंदवला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बेळगाव दौऱ्यावर येत असून सायंकाळी जनसेवक मेळाव्यातुन त्यांची जाहीर सभा होणार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या भाजप धार्जिण्या सदस्यांना सभेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या सभेत मुख्यमंत्री येडियुरप्पा, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले, नूतन मंत्री उमेश कत्ती यांच्यासह 20 हून अधिक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
दौ-याच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितली होती. पण शहा यांनी ही भेट नाकारल्याने मराठी भाषिकांमधुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यातच अमित शहा यांच्या या दौऱ्याला दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनीही कडाडून विरोध केला.राणी चन्नम्मा चौक येथे अर्धनग्न अवस्थेत निदर्शने करून “अमित शहा गो बॅक”चे शेतकऱ्यांनी जोरदार नारे लगावले.