मुलांची त्वचा खूपच नाजूक असते. त्यामुळे त्यांच्या त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक असते. विशेषत: हिवाळ्याच्या दिवसांत थंड हवेपसून वाचवण्यासाठी त्यांना गरम कपडे घालणे हा एक चांगला पर्याय आहे. पण त्यामुळे त्वचेमध्ये मुलायमपणा कायम ठेवता येणे शक्य नसते. अशा स्थितीत छोट्या बाळांची त्वचा मुलायम आणि मॉइश्चराइज्ड ठेवण्यासाठी काय करावं ते पाहूया…
कमीतकमी आंघोळ घाला
हिवाळ्यात साधारणपणे बालकांना थंडीपासून वाचण्यासाठी गरम कपड्यांमध्ये लपेटून ठेवले जाते. त्यातच त्यांना आठवड्यातून दोन ते तीन दिवसच आंघोळ घाला असा सल्ला डॉक्टर देतात. आंघोळीपूर्वी त्यांच्या शरीरावर चांगल्या तेलाने छान मालीश करा. यामुळे त्यांची त्वचा आतून मॉईश्चराईज्ड होते आणि अंगाला छान गरमी मिळते. यासोबतच त्यांचे बर्ड सर्क्युलेशन सुधारते. हिवाळ्यात बालकांना आंघोळ घालायची तर सर्वसाधारणपणे कोमट पाण्याचाच वापर करावा. कारण पाणी खूप गरम असेल तर बालकाची त्वचा भाजण्याची शक्यता असते. यासोबतच बालकांच्या त्वचेमधील तेलही खूप गरम पाण्यामुळे कमी होते.
हर्बल साबणाचा वापर
आपल्या बाळाची त्वचा स्वच्छ आणि मुलायम ठेवायची असेल तर त्यांना आंघोळ घालताना नेहमी सुगंध विरहीत हर्बल साबणाचा किंवा क्लिंजरचा वापर करावा. यानंतर बालकाचे शरीर घासून सुकवायला जाऊ नका. हलक्या हाताने टॉवेल त्याच्या अंगावर थपथपवाल तर ते त्याच्या त्वचेसाठी जास्त उत्तम ठरेल. त्यामुळे त्याच्या त्वचेवर रॅशेसही पडणार नाहीत.
त्वचा ठेवा हाइड्रेट
नवजात शिशूंची त्वचा हिवाळ्यात हायड्रेट ठेवण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे त्यांना आईचे दूध पाजणे. तुमचे बाळ आता जर सहा महिन्यांहून मोठे असेल तर त्याला आईच्या दुधासोबतच पाणी आणि वेगवेगळ्या फळांचा रसही द्यायला हवा. याशिवाय जर दात येण्याची वेळ असेल किंवा बाळाला काही आजार असेल तर त्याची त्वचा रूक्ष होऊ शकते. अशावेळी त्याच्या शरीरातील पाण्याचे घटते प्रमाण वाढविण्यासाठी त्याला दिवसातून दोन ते तीनवेळा ओआरएस द्यावे लागेल.