ऑस्ट्रेलियाविरूद्धचा अंतिम कसोटी सामना हिंदुस्थानी संघाने जिंकत, यजमानांचे त्यांच्याच धरतीवर वस्त्रहरण केलं आहे. संघाला अवघ्या 3 धावा हव्या असताना शार्दूल ठाकूरची विकेट गेल्याने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या पोटात गोळा उठला होता. मात्र रिषभ पंतने सुंदर खेळी साकारतानाच आपल्या संघाचाच विजय होईल याची शेवटपर्यंत खेळत काळजी घेतली. या सामन्यासोबतच हिंदुस्तानी संघाने कसोटी मालिकाही 2-1 ने खिशात घातली आहे. तब्बल 32 वर्ष ऑस्ट्रेलिया गॅबाच्या मैदानावर अपराजित राहिली होती. त्यांच्या या अपराजित भूमीवरच त्यांना चारीमुंड्या चीत केल्याने हिंदुस्थानचा हा विजय खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल.
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शेवट रोमहर्षक ठरला. शेवटपर्यंत या सामन्यातला थरार जिवंत होता. आजच्या दिवसाच्या 20 षटकांचा खेळ उरलेला असताना हिंदुस्थानी संघाला विजयासाठी 100 धावांची गरज होती. रिषभ पंतने या तणावाच्या परिस्थितीमध्ये डोकं शांत ठेवत, जिथे शक्य होईल तिथे मोठे फटके मारत पहिले अर्धशतक पूर्ण केलं आणि नंतर संघाला विजयही मिळवून दिला. पंत हा शेवटपर्यंत नाबाद राहिला. या ऐतिहासिक विजयानंतर रिषभ पंतच्या हाती तिरंगा देत संघाने संपूर्ण मैदानाला फेरी मारली. ऑस्ट्रेलियामध्ये हिंदुस्थानी संघाच्या क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर संघाला मिळालेलं मालिकेतील यश आणि सगळ्या क्रिकेटपटूंनी मैदानाला मारलेली फेरी ही लक्षणीय बाब ठरली.