मराठीत संगीतकार अजय-अतुल हे नाव किती मोठे आहे ते वेगळे सांगायची गरज नाही. त्यांचे संगीत म्हणजे सिनेमा हीट हे समीकरणच बनले आहे. अशा सुप्रसिद्ध संगीतकार जोडीचे संगीत असलेल्या ‘चंद्रमुखी’ या नव्या सिनेमातल्या गाण्यासाठी नुकतीच गोड गळ्याच्या आर्या आंबेकरची निवड करण्यात आली. प्रसाद ओक यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाच्या गाण्याचे रेकॉर्डिंग नुकतेच मुंबईत पार पडले. आपल्या या धमाकेदार कामाची माहिती आर्यानेच इन्स्टाग्रामवरील आपल्या पेजवर दिली आहे.
आपल्यासाठी ही अमूल्य संधी असल्याचेही ती या पोस्टमध्ये सांगते. पुढे ती म्हणते, अजयदादा, अतुलदादा मला ही अमूल्य संधी दिल्याबद्दल धन्यवाद… ‘चंद्रमुखी’च्या गाण्याच्या रेकॉर्डिंग प्रोसेसमध्येही मला सांभाळून घेतलेत. त्याबद्दलही तुमचे आभारच मानते. ते फक्त तुम्हीच करू शकता… असेही ती स्पष्ट करते. आर्याने यापूर्वी अगदी मोजकी परंतु खूप छान गाणी गायली आहेत. यात ‘बालगंधर्व’, ‘रेडीमिक्स’, ‘ती सध्या काय करते’ आणि ‘फोटोकॉपी’ या चित्रपटांच्या गाण्यांचा समावेश आहे. ‘तुला पाहते रे’, ‘अग्गंबाई सासूबाई’ आणि ‘माझा होशील ना’ या गाजलेल्या मराठी मालिकांची शीर्षक गीतेही तिनेच गायली आहेत.