दमदार स्टारकास्ट, अॅक्शन, रोमान्स आणि मनोरंजनाचा पुरेपूर मसाला असलेल्या ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या राजाभाऊ आप्पाराव घुले यांची पहिलीच निर्मिती असलेल्या “अंकुश” या चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच नुकतंच अभिनेते जॉनी लिव्हर, अभिनेते अली असगर आणि अभिनेते कृष्णा अभिषेक यांच्या हस्ते संपन्न झाला. या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टीत प्रचंड उत्सुकता असून येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून राजाभाऊ आप्पाराव घुले ‘अंकुश’ या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत. सुप्रसिद्ध व्यावसयिक असलेल्या आणि आता चित्रपट निर्मितीत पदार्पण केलेल्या निर्माते राजाभाऊ यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी वेळात वेळ काढून चित्रपटाची पटकथा, संवाद, संगीत तसेच चित्रपटाचे चित्रीकरण या गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष देऊन त्यांनी काम केले आहे. चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांचे आहे . दीपराज हा नव्या दमाचा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत असून चित्रपटात अभिनेत्री केतकी माटेगांवकर, अभिनेते सयाजी शिंदे,मंगेश देसाई, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, पूजा नायक अशी तगडी स्टारकास्ट आहे.
मराठीतील दिग्गज संगीतकार अमितराज आणि चिनार-महेश यांनी या सिनेमाचे संगीत केले आहे. हिंदी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमर मोहिले यांनी या चित्रपटाचे पार्श्वसंगीत केले आहे. मंगेश कांगणे, क्षितिज पटवर्धन, समृद्धी पांडे आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, हृषिकेश रानडे, अमितराज , हर्षवर्धन वावरे, राहुल सक्सेना, नकाश अजीज आणि केतकी माटेगांवकर यांच्या आवाजात चित्रपटाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. नागराज दिवाकर यांनी छायांकन, तसेच अनेक पुरस्कार प्राप्त संकलक नीलेश गावंड यांनी या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि केजीएफसारख्या चित्रपटांचे अॅक्शन दिग्दर्शक विक्रम मोर, विख्यात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी नृत्य दिग्दर्शन, कलादिग्दर्शन गिरीश कोळपकर यांनी केलं असून विशाल चव्हाण कार्यकारी निर्माता आहेत.
“अंकुश” या चित्रपटाचा टीझर अतिशय दमदार आहे. अॅक्शन, रोमान्स आणि उत्तम कलावंतांच्या सशक्त अभिनयाची मेजवानी या चित्रपटातून मिळणार आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी कुतुहल निर्माण झालं आहे.