ऍण्टेलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात यावा अशी मागणी आज विरोधकांकडून करण्यात आली. याप्रकरणी तपास करण्यास महाराष्ट्र पोलीस सक्षम असून त्यांच्यावर अविश्वास दाखवू नका, असे आवाहन करतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविण्यात येईल अशी माहिती आज विधानसेभेत दिली.
कायदा-सुव्यवस्थेवरील विरोधकांच्या प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अँटेलियाबाहेर सापडलेल्या जिलेटीन कांडय़ा भरलेली स्फोटके सापडणे ही गंभीर बाब आहे. याप्रकरणी सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याचा मुद्दा उपस्थित करीत या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात यावा अशी मागणी केली.
मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला असल्याची माहिती त्यांनी दिली. यावर माहिती देताना अनिल देशमुख यांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्या अंगावर कोणत्याही मारल्याच्या खुणा नाहीत. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात येणार असून ठाणे पोलीस तपास करीत असल्याचे सांगितले. मात्र यावर समाधान न झालेल्या विरोधकांकडून पुन्हा एकदा प्रकरण एनआयएकडे सोपविण्याची मागणी करण्यात आली. या मागणीनंतर महाराष्ट्र पोलिसांवर अविश्वास दाखवू नये असे अनिल देशमुख यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिली.
अर्णब गोस्वामीला आत टाकले म्हणून सचिन वाझेंवर राग आहे का?
यावेळी उत्तर देताना या गाडीचा मूळ मालक हा सॅम पिटर न्यूटन असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. ही गाडी त्यांनी इंटेरिअरसाठी मनसुख यांच्याकडे दिली होती. मात्र हा खर्च अधिक झाल्याने न्यूटन यांनी पैसे न दिल्याने मनसुख यांनी गाडी स्वतःच्या ताब्यात ठेवली असे स्पष्ट करतानाच मनसुख यांचा मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत सापडला नसल्याचे सांगितले. मात्र यानंतरही फडणवीस यांच्यासह आशीष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांनी एनआयएची मागणी कायम ठेवली. यावर बोलताना अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र, मुंबई, ठाणे पोलीस तपास करायला सक्षम आहेत.
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामीला आत टाकले. अन्वय नाईकच्या केसमध्ये त्याला टाकलं होतं, त्याला घरातून उचलून नेलं होतं म्हणून तुमचा त्यांच्यावर राग आहे का असा सवाल करतानाच, याप्रकरणी जी माहिती असेल ती आमच्याकडे द्या. त्या माहितीने तपासाला मदतच होईल असे सांगितले.
मनसुख क्रॉफर्ड मार्केटमध्ये कुणाला भेटले -फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांनी आपल्या जबाबात ही गाडी मी माझ्याकरिता विकत घेतली असल्याचे म्हटले. स्टेअरिंग जाम झाल्यानंतर ते क्रॉफर्ड मार्केटला गेले आहेत. तिथे कुणाला भेटले? त्याचप्रमाणे स्फोटकांच्या गाडीमध्ये जी चिठ्ठी सापडली ती सर्वात पहिल्यांदा तपास अधिकारी सचिन वाझे यांना सापडली. वाझे आणि मनसुख यांचे बोलणे झाले आहे. आता या तपासातला दुवा असलेल्या मनसुख यांचा मृत्यू झाला आहे. मनसुख यांचे हात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला असे अनेक प्रश्न उपस्थित करीत या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात यावा अशी मागणी केली.
ज्या पोलिसांच्या विश्वासावर राज्य केलं त्यांच्यावर अविश्वास का दाखवताय- अनिल परब
यावेळी अनिल परब यांनी गृहमंत्री हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारच सांगत आहेत. पण ज्यांच्या विश्वासावर आपण राज्य केलं, माझे पोलीस समर्थ आहेत असे बोलत होतात ते पोलीस बदलले लगेच? त्या पोलिसांच्या कर्तृत्वावर शंका घेता, असा सवाल अनिल परब यांनी केला. पोलिसांवर विश्वास नाही का? त्यांना संधी द्या, तपास करू देत. जर तपास करण्यात अपयशी ठरले तर आपली मागणी योग्य आहे. एका दिवसात एनआयएकडे जाताहेत हे योग्य नाही, असे ते पुढे म्हणाले.
सौजन्य : दैनिक सामना