• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

अमेरिकेचं लसीकरण झालं, आपलं काय?

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 18, 2021
in संपादकीय
0
अमेरिकेचं लसीकरण झालं, आपलं काय?

गेलं वर्ष जगभर कोरोनाचं वर्ष होतं. यंदाचं वर्ष लसींचं आहे. जगभरात अनेक कंपन्यांनी कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला आहे, तिच्या क्लिनिकल ट्रायल्स पूर्ण करून ती बाजारात आणण्याची चढाओढ सुरू आहे. अमेरिका हा जगातला सगळ्यात बलाढ्य देश. त्यामुळे तिथे कोणती लस वापरली जाते, तिचे काय परिणाम होतात, तिथला लसीकरणाचा कार्यक्रम कसा यशस्वी होतो, याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं असणं स्वाभाविक आहे.

पण आपण अमेरिकेतल्या कोरोनाच्या लसीकरणाविषयी बोलत नाही आहोत. आपण बोलतो आहोत ते अमेरिकेतल्या उच्चवर्चस्ववादी, स्थलांतरितविरोधी, लोकशाहीविरोधी आणि उदारमतवादविरोधी विषाणूंबद्दल आणि त्यावर अमेरिकेने टोचून घेतलेल्या लसीबद्दल.

या लसीचं नाव होतं डोनाल्ड ट्रम्प.

अनेकदा लसीचे काही साइड इफेक्ट असतात, दुष्परिणाम असतात. कधी डोकं दुखतं, कधी पुरळ येतं, कधी वांत्या होतात, कधी भोवळ येते. तशाच प्रकारे या ट्रम्प लसीच्या साइड इफेक्टने अमेरिकेला भोवळ आणणारी घटना नुकतीच कॅपिटॉल हिल या अमेरिकन संसदेच्या परिसरात घडली.

बेभान आणि बेदरकार ट्रम्प समर्थकांनी २०२० च्या निवडणुकीचा निकालच नाकारून ट्रम्प हेच अध्यक्षपदी पुन्हा विराजमान व्हावेत, या ‘मागणी’साठी कॅपिटॉल हिलवर हल्ला चढवला आणि तिथल्या इमारतींमध्ये प्रवेश केला. संसदेत प्रवेश केला. तिथे विध्वंस केला.

आता प्रश्न असा आहे की, हा साइड इफेक्ट एवढ्यापुरताच राहील का? अमेरिकेतली लोकशाही पुन्हा ठणठणीत होईल का?

अमेरिकेतल्या घटनांचा लस टोचून घेण्याशी काय संबंध आहे, हे समजण्यासाठी आधी लस कशी काम करते, ते समजलं पाहिजे.

लस म्हणजे एका द्रावणात अर्धमेले केलेले रोगाचे जिवाणू किंवा विषाणू. एखादा आजार होऊ नये, यासाठी प्रतिकारशक्ती उत्तम स्थितीत असताना लस टोचून घ्यायची म्हणजे हे अर्धमेले विषाणू शरीरात टोचून घ्यायचे. ते शरीरात शिरताच आतल्या पांढर्‍या पेशींसारख्या संरक्षण पेशींचं सैन्य सजग होतं. शत्रूच्या नि:पाताला सज्ज होतं. आपल्या पेशी या अर्धमेल्या विषाणू किंवा जिवाणूंवर हल्ला करतात. थोडंफार युद्ध होतं आणि रोगाचे विषाणू किंवा जिवाणू अर्धमेले असल्याने ते पराजित होतात.

यामुळे होतं काय, तर शरीरातल्या सैन्याला या शत्रूची ओळख पटते. तो कसा दिसतो, कसा वागतो, कुठे हल्ला करतो, त्याची बलस्थानं काय, मर्मस्थानं काय, हे आपल्या पेशींना कळून जातं आणि मग पुढच्या सगळ्या आयुष्यात त्या रोगाचे जंतू, जिवाणू, विषाणू शरीरात शिरले तरी त्यांच्या नि:पातासाठी आपल्या शरीरातली यंत्रणा सज्ज असते. तो आजार आपल्यासाठी प्राणघातक ठरू शकत नाही.

आता अमेरिकेत काय घडलं? अमेरिकेने कसली लस टोचून घेतली?

खरं तर ही लस अमेरिकन नागरिक गाफील असताना टोचली गेली. त्यांच्याकडच्या चमत्कारिक अध्यक्षीय निवडणूक पद्धतीमुळे लोकप्रिय मतांमध्ये पिछाडीवर असूनही डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदावर विराजमान झाले आणि त्यांच्या संकुचिततेच्या विषाणूने अमेरिकेत हैदोस माजवायला सुरुवात केली. स्वत:ला भूमिपुत्र मानणार्‍या अमेरिकेतल्या गोर्‍या नागरिकांच्या मनातल्या असुरक्षिततेला खतपाणी घालणारी घातक नीती ट्रम्प यांनी अवलंबली. खरं तर अमेरिकेतले मूळ रहिवासी होते इंडियन्स. त्यांचं शिरकाण करून, त्यांच्या जमिनी बळकावून गोर्‍या स्थलांतरितांनी अमेरिका बळकावली. आफ्रीकेतून काळे गुलाम मागवून त्यांच्याकडून कष्टांची कामं करून घेतली. नंतर जगभरातल्या गुणवान स्थलांतरितांच्या प्रज्ञेच्या आणि बुद्धिमत्तेच्या बळावर जगातली सगळ्यात मोठी सत्ता बनण्यापर्यंत मजल मारली.

या सगळ्यात या सर्वात पहिल्यांदा आलेल्या उपर्‍यांचं योगदान काहीच नव्हतं. अमेरिका सर्वशक्तिमान बनली ती भांडवलशाही, गुणवत्तेला पोषक धोरणं, उदारमतवाद आणि सर्वसमावेशकता या मूल्यांच्या बळावर.

ट्रम्पच्या धटिंगणशाहीने या मूलाधारांनाच हात घालण्याचा प्रयत्न केला, अमेरिकेला अमेरिका बनवणारा पायाच उखडून टाकला, तोही ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ अशी थेट विरोधी अर्थाची घोषणा देऊन (इथे तुम्हाला आपल्याकडच्या अशाच पोकळ घोषणांचे स्मरण होणे स्वाभाविक आहे). आपण जागे आहोत की दु:स्वप्न पाहतो आहोत, असा प्रश्न अमेरिकनांना रोज पडावा, अशी ट्रम्प यांची कारकीर्द होती. त्यांच्या बेबंदशाहीचा कळस कोरोनाकाळात गाठला गेला आणि त्यांचं पतनही तेव्हाच निश्चित झालं.

पण त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अर्थातच ते मान्य नव्हतं. त्यातून कॅपिटॉल हिलवरच्या हल्ल्यासारखं लाजिरवाणं प्रकरण घडून आलं. आता प्रश्न असा आहे की, ट्रम्प यांच्या माध्यमातून जो संकुचिततेचा, वर्णवर्चस्वाचा, खोट्या अस्मितांचा विषाणू अमेरिकेच्या लोकशाही व्यवस्थेत शिरला होता, ती लस ठरणार का? ट्रम्प स्वत:ला सर्वशक्तिमान मानत असले तरी त्यांच्या रिपब्लिकन पक्षातल्या सदस्यांसह बहुतेक सर्व स्तंभांनी त्यांचे इरादे हाणून पाडण्याइतका कणखरपणा दाखवला. त्यांच्या विरोधात जाण्याचं धैर्य दाखवलं. त्यामुळे हा हल्ला बोथट झाला आणि शेवटी ट्रम्प यांना समाजमाध्यमांवर बंदी येण्याची वेळ पत्करून पळ काढावा लागला.

उदारमतवाद, स्वातंत्र्य, सर्वसमावेशकता ही मूल्यं कायमस्वरूपी गृहीत धरता येत नाहीत, त्यांच्यावर हल्ले होऊ शकतात आणि असे विषाणू समाजपुरुषाच्या शरीराला जर्जर करू शकतात, हे ट्रम्प यांच्या उदयातून स्पष्ट झालेलं आहे. मात्र, अमेरिकेत हे लसीकरण यशस्वी झालं असावं, हे ट्रम्प यांच्या गच्छंतीतून मानायला हरकत नाही.

अमेरिकेतल्या घडामोडींमधून जगातल्या सगळ्याच लोकशाही राष्ट्रांनी धडा घ्यायला हरकत नाही. राष्ट्रवादाच्या नावाखाली पेरली जाणारी ठोकशाही, एककल्ली, एकतंत्री कारभार, लोकशाही मूल्यांची जागोजाग पायमल्ली, लोकशाही व्यवस्थांचा विध्वंस, देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून सगळ्या समाजाला काही मोजक्या धनवंतांचे गुलाम बनवून टाकण्याची नीती यांचे विषाणू धर्मांधतेच्या, जात्यंधतेच्या, विद्वेषाच्या वार्‍यावर स्वार होऊन वेगाने पसरतात आणि सगळ्या देशाला खिळखिळे करतात. या विषाणूंना वेळेत ओळखून त्यांचा नि:पात केला, तरच देश वाचू शकतो. नाहीतर त्याचे तुकडे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत.

अमेरिकेच्या लसीकरणाचा हाच धडा आहे. तो शिकण्याची आपली इच्छा आहे का, हा खरा प्रश्न आहे.

Previous Post

पेट्रोल डिझेलचे दर वाढले; प्रतिलिटरमागे 25 पैशांची वाढ

Next Post

ना सप्तपदी, ना मंगलाष्टके; संविधानाची शपथ घेऊन बांधली लगीनगाठ

Next Post
ना सप्तपदी, ना मंगलाष्टके; संविधानाची शपथ घेऊन बांधली लगीनगाठ

ना सप्तपदी, ना मंगलाष्टके; संविधानाची शपथ घेऊन बांधली लगीनगाठ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.