आलोक (सकाळ टाइम्स आणि सकाळचे व्यंगचित्रकार)
मला बाळासाहेबांच्या चित्रांनी नेहमीच अचंबित केलं आहे. त्यांच्यावर आणि आर. के. लक्ष्मण या माझ्या परात्पर गुरूंवर डेव्हिड लो या जगात सर्वश्रेष्ठ मानल्या जाणार्या राजकीय व्यंगचित्रकाराचा प्रभाव होता, हे सर्वज्ञात आहे. पण, लो यांची फायनल चित्रांआधीची पेन्सिल स्केचेस मी पाहिली आणि अभ्यासली आहेत. ती अतिशय सर्वसामान्य भासतात, त्यांच्यातून पुढे महान व्यंगचित्रं तयार झाली म्हणजे लो यांनी केवढी मेहनत घेतली असेल, ते लक्षात येतं. मात्र, बाळासाहेबांची व्यंगचित्रं पाहिली की माझ्या मनात ‘साटकन् फटकारा’ असाच शब्दप्रयोग येतो. त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये, रेषांमध्ये जी सहजता आहे, जो ओघ आणि वेग आहे, तो अद्भुत असाच आहे.