सोनी एन्टरटेन्मेंट टेलीव्हिजनवर सध्या सुरू असलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. येत्या काही भागांमध्ये अहिल्या आणि खंडेराव यांच्या विवाह सोहळ्याचा जल्लोष दिसेल. अहिल्याच्या जीवनातील ही एक महत्त्वाची घटना असल्यामुळे विवाहविधी अत्यंत शानदार करण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसली आहे. हिरवा चुडा भरण्याचा विधी अत्यंत मंगल समजला जातो आणि त्याच्यापासून विवाह सोहळ्यास आरंभ होतो.
कुटुंबातील सर्व महिला एकत्र होतात आणि अहिल्याची आई तिच्या हातात हिरवा चुडा भरते तेव्हा पारंपरिक मराठी लोकगीते गातात. चुडा भरल्यानंतर हळदीच्या विधीत अहिल्याची भूमिका करणारी अदिती जलतारे सुंदर पारंपरिक पिवळ्या रेशमी नऊवारीत आणि रुईच्या फुलांच्या मुंडावळ्या बांधलेल्या रूपात दिसेल, तर दुसरीकडे नवरदेव खंडेरावाची भूमिका करणारा क्रिश चौहाण शालीन पीतांबर आणि उपरणे अशा पोषाखात दिसेल. विवाह सोहळ्याचा एक भाग म्हणून प्रेक्षकांना आंतरपाटदेखील दिसेल. त्यानंतर सप्तपदी होते व त्यावेळी पूजा सांगणारा ब्राह्मण वर आणि वधूला एकेक वचनाचा अर्थ उलगडून सांगतो.
याबाबत बोलताना अदिती जलतारे म्हणाली, विवाहाचे दृश्य शूट करायला खूपच मजा आली. कारण मला नटायला खूप आवडते आणि मला सगळ्या प्रकारची भरजरी वस्त्रे आणि सुंदर दागदागिने परिधान करता आले, असेही ती म्हणाली.