पूरमुक्त मुंबईसाठी मिनी पंपिंग स्टेशन आणि पाण्याच्या निचऱयाचे नियोजन, कचऱयाचे प्रमाण कमी करण्यासाठी योजना, कॉमन तिकीट, लटकणाऱया ओव्हरहेड वायर काढून टाकणे आणि मुंबईची वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी शहराच्या सीमेवर बस थांबवून ‘बेस्ट’, मेट्रोने प्रवाशांना वाहतुकीची सेवा देण्यासह ट्रान्सपोर्ट हब तयार करून वाहतूककोंडीतून सुटका करण्याचे ‘स्वच्छ, सुंदर, आनंदी मुंबई’चे महत्त्वाकांक्षी ‘व्हिजन’ आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडले. आदित्य ठाकरे यांनी आज पालिकेत विविध विभागांच्या मॅरेथॉन बैठका घेऊन पालिकेच्या माध्यमातून सुरू असणाऱया आणि प्रस्तावित कामांचा आढावा घेतला.
मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे अतिवृष्टी आणि समुद्राला भरती असताना अनेक भागांत पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. गेल्या काही वर्षांत मुंबईत होणाऱया अतिवृष्टीमुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे मुंबईची पाणी तुंबण्यातून सुटका करण्यासाठी पालिकेने प्रभावी नियोजन सुरू केले आहे.
यात पाणी तुंबणाऱया 386 ठिकाणांचा शोध घेण्यात आला असून इंजिनीयरच्या माध्यमातून पुढील सहा महिन्यांत यातील जास्तीत जास्त ठिकाणी उपाययोजना करण्यात येणार आहेत. हिंदमातासारख्या ठिकाणी विशेष नियोजन करण्यात येत आहे. याशिवाय मोगरा आणि माहुल पंपिंग स्टेशनचे काम लवकरच सुरू होणार आहे. माहुल पंपिंग स्टेशनच्या कामासाठी आपण स्वतः केंद्र सरकारकडे परवानगीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
या वेळी परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू आदी उपस्थित होते.